Surat Chennai Greenfield Expressway
Surat Chennai Greenfield Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सुरत-चेन्नई महामार्गासाठी भूसंपादन साडे 9 लाख रुपये प्रतिगुंठा दराने करा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड महामार्गासाठी (Chennai Surat Greenfield Highway) संपादित करण्यात येत असलेल्या जमिनींना सरकारकडून अत्यल्प मोबदला दिला जात असल्याने त्याविरोधात नाशिक जिल्ह्यतील सर्व बाधीत शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.    

शहरातील आडगाव येथे एकत्र आलेल्या जमीन मालकांनी प्रति गुंठा २.४० लाख रुपये या शासकीय दराच्या चौपट मोबदला देण्याची मागणी केली. शासनाने मागणी मान्य न केल्यास आडगाव, विंचुरगवळी, ओढा, शिलापूर, लाखलगाव जमीनमालकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव केला आहे. यामुळे पुढच्या काळात चेन्नई-सुरत ग्रीनफिल्डसाठी होणारे भूसंपादन कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातून सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यांमधून सुरत-चेन्नई महामार्ग जात आहे. या मार्गासाठी नाशिक तालुक्यातील आडगाव, विंचुरगवळी, ओढा, माडसांगवी, शिलापूर, लाखलगाव या गावातील जमीन मालकांच्या बागायती जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

या जमिनींसाठी शासनाकडून शासकीय दरानुसार अवघा १ लाख ३० हजार रुपये गुंठे याप्रमाणे मोबदला देण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यातही या दरात दहा टक्के कपात केली जाणार असल्याचे सांगितले जाते. यातील आडगाव महापालिका हद्दीत असून तेथील शासकीय दर २ लाख ४० हजार रुपये प्रति गुंठा आहे. शेजारच्या गावांमध्येही असेच दर आहेत.

या जमिनींसाठी मिळणारा दर तुटपुंजा असल्याने शेतकरी या दराबाबत असंतुष्ट आहेत. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या भूसंपादन प्रक्रियेस विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संघर्ष समिती स्थापन करण्याचा ठराव आडगावच्या मनुमाता देवी मंदिरातील बैठकीत करण्यात आला.

या बैठकीला ३०० जमीनमालक उपस्थित होते. यावेळी पंडित तिडके, दशरथ केदार, किशोर ढगे, प्रकाश शिंदे, गणेश खांदवे, किरण पिंगळे, बाळासाहेब केदार, राजाराम खांडेकर, कांतीलाल बोडके, विनायक कांडेकर आदी उपस्थित होते.