नाशिक (Nashik Peth Highway): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे आधुनिकीकरण केले जात असून, हे सर्व रस्ते बाह्यवळण रस्त्याला जोडले जाणार आहेत. यामुळे बाहेरून येणारी वाहने थेट त्र्यंबकेश्वर येथे जाऊ शकणार आहेत. तसेच नाशिक शहरात न येता ही वाहने मार्गस्थ होऊ शकणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने पेठ-नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक-पेठ या रस्त्याला दहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. सिंहस्थकाळात या मार्गावरून भाविक मोठ्याप्रमाणावर नाशिक व त्र्यंबकेश्वरला येण्याचा अंदाज आहे. यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतला असून, भूसंपादन अधिसूचना जाहीर केली आहे. त्यासाठी नाशिक, दिंडोरी व पेठ या तीन तालुक्यांतील १४ गावांत जमीन संपादित केली जाणार आहे. चौपदरीकरणामुळे सिंहस्थात गुजरातमार्गे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होईल.
नाशिक-सिहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर नाशिक व त्र्यंबकेश्वरला जोडणारे नाशिक-वणी, घोटी-त्र्यंबकेश्वर, नाशिक-त्र्यंबकेश्वर, वाडीवर्हे- दहेगाव- जातेगाव- तळेगाव- महिरावणी-दुडगाव- गणेशगाव रस्ता, पेठ- तोरंगण-हरसूल-वाघेरा- अंबोली-पहिने- घोटी रस्ता, त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड जोपुळ-पिंपळगाव,त्र्यंबकेश्वर-देवगाव- खोडाळा या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण मंजूर झाले असून या रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत.
या रस्त्यांप्रमाणेच गुजरातहून नाशिकला येण्यासाठी सोयीचा असलेला नाशिक-पेठ हा रस्ताही महत्वाचा आहे. यामुळे या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. या महामार्गावर नाशिक ते पेठ या मार्गालगत ११.६०० ते ५३.६०० किलोमीटर म्हणजे एकूण ४२ किलोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरणासह आनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय हा प्रकल्प उभारणार असून, त्यासाठी जमीन भूसंपादनाकरिता अधिसूचना जाहीर झाली आहे.
नाशिक-पेठ चौपदरीकरणाकरिता दिंडोरी, पेठ व नाशिक या तालुक्यांत जमीन संपादित करण्यात येईल. एकूण ९५ गटांमधील सात हेक्टर क्षेत्र संपादित करायचे असून, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ ला होणार असले तरी प्रमुख तिन्ही अमृतस्नान २०२७ मध्ये आहे. तत्पूर्वी मार्च २०२७ पूर्वी कुंभमेळ्याशी निगडित सर्व प्रमुख कामे पूर्ण करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक-पेठ महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गुजरातमार्गे नाशिकमध्ये येणाऱ्या उत्तर भारतीय भाविकांचा प्रवास जलद होणार आहे.
असे होणार भूसंपादन
दिंडोरी तालुक्यातील ७ गावांमधील ४८ गट
पेठ तालुक्यातील ६ गावांमधील ४६ गट
नाशिक तालुक्यातील १ गावामधील १ गट