Road
Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 'या' तालुक्यांसाठी Good News! 900 कोटीतून तयार होणार 106 किमीचा...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यात नाशिक - पुणे महामार्ग, मुंबई - आग्रा महामार्ग, नाशिक - संभाजीनगर राज्यमार्ग पूर्वीपासून असून, अलिकडच्या काळात विंचूर प्रकाशा, समृद्धी महामार्ग तयार झाले आहेत. तसेच सुरत-चेन्नई प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. मात्र, या प्रमुख मार्गांवरील गावांव्यतीरिक्त तालुक्याच्या अंतर्गत भागातील गावांना जोडण्यासाठी दर्जेदार रस्ते नाहीत. पुर्वीच्या रस्त्यांना पुरेसा निधी नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

निफाड, सिन्नर, अकोले, इगतपुरी या तालुक्यांमधील आडवळणाच्या गावांना जोडण्यासाठी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाने १०६ किलोमीटरचा सिमेंट काँक्रिट मार्ग मंजूर केला आहे. या रस्त्यासाठी ९०० कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या रस्ता कामाचे कार्यारंभ आदेश देऊन या कामास प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. या रस्त्याचे काम सरकारच्या हायब्रिड ॲन्युईटी या योजनेप्रमाणे होणार आहे.

निफाड, येवला, सिन्नर अकोले, इगतपुरी या तालुक्यामधील अंतर्गत भागातील गावांना जोडण्यासाठी एक चांगल्या दर्जाचा मार्ग असावा, यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाला निवेदन दिले होते. त्यानुसार या महामंडळाने निफाड तालुक्यातील विंचुर येथून सुरू होणारा डोंगरगाव, ब्राम्हणगाव, खेडलेझूगे गोदावरी नदीपर्यंत १४ किलोमीटर, तेथेून गोदावरीनदी पार करून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे, धनगरवाडी, पंचाळे, पांगरी, मर्हळ, मानोरी, दोडी बुद्रूक, दापूर, धुळवाड, हिवरे पिपळे, टेंभुरवाडी, पाडळी, ठाणगांवमार्गे असा ५८ किलोमीटर लांबीचा रस्ता पुढे अकोले तालुक्यातील केळी ते कोकणगाव मार्गे २० किलोमीटरचा मार्ग म्हैसवळण घाटातून इगतपुरी तालुक्यात जाणार आहे.

तोच मार्ग इगतपुरी तालुक्यातील पिपळगांव मोर, अधरवड, टाकेद, वासाळी, अंबेवाडी, आंबेवाडी ते शासकीय वसतीगृह इगतपुरी येथे मुंबई आग्रा हायवेपर्यंत असा ३० किलोमीटर आहे. या संपूर्ण रस्त्याची लांबी १०६ किलोमीटर आहे. हा रस्ता साडेसात मीटर रुंदीचा व संपूर्ण काँक्रिटीकरणाचा असणार आहे.

निफाड, सिन्नर, अकोले व इगतपुरी या तालुक्यांच्या ठिकाणांना जोडण्यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्ग आहेत. मात्र, या तालुक्यांमधील अंतर्गत भागातील गावांना जोडण्यासाठी ग्रामीण रस्त्यांवरच अवलंबून राहावे लागते. त्या रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्यामुळे नागरिकांना दूरवरून वळसा घालून जावे लागते. यामुळे या तालुक्यांमधील अंतर्गत भागातील गावे एकमेकांना जोडण्यासाठी काँक्रिटचा रस्ता असावा, अशी मागणी होती.

त्यासाठी निफाड, सिन्नर, अकोले व इगतपुरी या तालुक्यांमधील अंतर्गत भागातील गावांना जाण्यासाठी काँक्रिटचा रस्ता उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या १०६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी २४ पॅकेजमध्ये ९०० कोटींची टेंडर प्रक्रिया राबवली आहे. या कामांच्या टेंडरमध्ये सहभागासाठी १२ एप्रिलपर्यंत मुदत होती. आचारसंहितेच्या काळात टेंडरसंबंधी तांत्रिक बाबींची पूर्तता करून आचारसंहिता संपल्यानंतर कार्यारंभ आदेश दिले जाणार आहे.