नाशिक (Nashik): नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त रेल्वेमार्गाने मोठ्यासंख्येने भाविक येणार हे गृहीत धरून रेल्वेने यापूर्वी तयार केलेल्या आराखड्यानुसार नाशिक रोड, ओढा, खेरवाडी, कसबेसुकेणे या रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे.
या स्थानकांवर उतरलेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे जायचे असल्यास त्यांना पुन्हा नाशिक शहरातून जावे लागणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांना घोटी स्थानकावर उतरवून तेथून घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गाने त्र्यंबकेश्वर येथे थेट जाता येईल, अशी सुविधा उभारण्याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्याला मूर्त स्वरूप आल्यास घोटी रेल्वे स्थानकाचाही सिंहस्थाच्या निमित्ताने विकास केला जाऊ शकतो.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने रेल्वेने मोठ्या संख्येने भाविक येणार हे गृहित धरून रेल्वे प्रशासनाने विकास आराखडा तयार केला आहे. त्यात नाशिकरोड रेल्वेस्थानक अपुरे पडणार असल्यामुळे ओढा, खेरवाडी, कसबेसुकेणे या रेल्वेस्थानकांचा विकास केला जाणार आहे.
देशाच्या वेगवेगळ्या भागातून रेल्वेमार्गाने येणा-या भाविकांना सोईचे व्हावे, या हेतूने हे नियोजन केले असून रेल्वेस्थानक ते पंचवटीतील घाटांपर्यंत बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे ही रेल्वेस्थानके दूर असली तरी भाविकांची पायपीट कमीतकमा करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे.
भाविकांच्या सुरक्षित, सुरळीत व सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत कुंभमेळा काळातील रेल्वे वाहतूक व्यवस्थापन, अतिरिक्त गाड्यांचे नियोजन, रेल्वे स्थानकांवरील सुविधा, भाविकांची गर्दी नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सध्या विकसित करण्यात येत असलेल्या रेल्वेस्थानकांवरून केवळ नाशिकमध्ये जाणा-या भाविकांचा विचार करण्यात आले आहे. काही भाविकांना त्र्यंबकेश्वर येथे जायचे असल्यास त्यांना बससेवा उपलब्ध करून दिली, तरी संपूर्ण नाशिक शहर ओलांडून जावे लागणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणा-या भाविकांची घोटी रेल्वे स्थानकावरून व्यवस्था करता येऊ शकते, का या पर्यायाबाबत चर्चा झाली.
सध्या घोटी ते त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून सिंहस्थापूर्वी ते काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरला जाणा-या भाविकांना घोटी स्थानकावर उतरवल्यास त्यांना बससेवा उपलब्ध करून देऊन थेट पहिने फाट्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते.
हा पर्याय सोयीस्कर असल्यामुळे त्याबाबत विचार करून त्या अनुषंगाने घोटी स्थानकाचा विकास करता येईल का, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. घोटी रेल्वे स्थानकाबरोबरच उंबरमाळी (ठाणे जिल्हा) रेल्वेस्थानक विकसित करण्याच्या शक्यतांवर रेल्वे विभागाकडून विचार केला जात आहे.