Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: 71 कोटींच्या पेठरोडबाबत स्मार्ट सिटीच्या भूमिकेकडे लक्ष

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातून जाणाऱ्या पेठरोडची जवळपास साडेसहा किलोमीटरपर्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातील चार किलोमीटरच्या मार्गाचे कॉंक्रिटीकरण करण्याची तयारी स्मार्ट सिटी कंपनीने दर्शवल्यानंतर महासभेने तसा ठराव मंजूर केला. या ठरावाची तांत्रिक बाजू तपासल्यानंतर बांधकाम विभागाने हा ठराव अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटी कंपनीकडे पाठवला आहे. यामुळे मागील दोन दिवसांपासून रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्या पेठरोड भागातील रहिवाशांच्या स्मार्ट सिटीच्या निर्णयाकडे नजरा लागून आहेत.

नाशिक पेठ या मार्गाचा साडेसहा किलोमीटर भाग नाशिक महापालिका हद्दीत येतो. केंद्र सरकारने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग दर्जा दिल्यानंतर नाशिक पेठ या मार्गाचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्यातून नाशिक महापालिका हद्दीतील साडेसहा किलोमीटरचा महामार्ग वगळण्यात आला आहे. या साडेसहा किलोमीटर रस्त्याचे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी २०१४ मध्ये डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पुढच्या एकदीड वर्षातच त्या रस्त्यावर खड्डे पडले. त्यानंतर दरवर्षी पावसाळ्यानंतर या मार्गावरील खड्डे बुजवण्यापलिकेडे नाशिक महापालिकेने या रस्त्याबाबत काहीही केलेले नाही. एकीकडे पेठवरून येणारी वाहने नाशिक महापालिका हद्दीपर्यंत कॉंक्रिटीकरण केलेल्या मार्गावरून येतात व महापालिका हद्दीत येताच मोठमोठ्या खड्ड्यांमधून वाहने चालवावी लागतात, असे चित्र आहे. तसेच रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होऊन नागरिकांचे जीव गेलेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी लोकांची ओरड वाढली आहे.

लोकांची मागणी लक्षात घेऊन आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी महापालिकेकडे या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी पाठपुरावा केला. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने एवढ्यामोठ्या रस्त्यासाठी निधी नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. त्यातून त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून या रस्त्याच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव सादर केला. त्यावर स्मार्ट सिटी कंपनीने नाशिक महापालिकेच्या महासभेने तसा ठराव मंजूर केल्यास पहिल्या टप्प्यात चार किलोमीटरचे कॉंक्रिटीकरण करण्यास तत्वता मान्यता दिली. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या महासभेने पेठरोडच्या कॉंक्रिटीकरणाचे काम स्मार्ट सिटी कंपनीने करावा, असा ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर लेखा विभागाने या ठरावाची तांत्रिक बाजू तपासून तो बांधकाम विभागाकडे पाठवला आहे. बांधकाम विभागाने तो प्रस्ताव आता स्मार्ट सिटी कंपनीकडे पाठवला आहे.

पेठरोडची दैन्यावस्था झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे पंचवटीत पेठरोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी रस्ता रोको आंदोलन करून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते. या परिसरातील भाजपचे नगरसेवक अरुण पवार यांनी तर या रस्त्याच्या नुतणीकरणासाठी महापालिकेने पंचवटीत स्टेडियमसाठी मंजूर केलेला निधी रस्ता कामासाठी वळवण्यात यावा, अशी मागणी केली होती. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने महासभेचे ठराव तातडीने स्मार्ट सिटी कंपनीकडे पाठवला आहे. यानंतर स्मार्ट सिटी कंपनी काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.