नाशिक (Nashik): नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर उपयोजना म्हणून काही वर्षांपूर्वी डबल डेकर उड्डाणपुलाचा प्रस्ताव आला होता. मात्र, तो कागदावर येण्याच्या आत तो मागे पडला व वाहतूक कोंडीची समस्या वाढत गेली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचा निर्णय कुंभमेळा विकास प्राधिकरणने घेतला असून त्यासाठी द्वारका चौकात तीन अंडर पास उभारले जाणार असून त्यातून वाहने समोरासमोर न येता या भुयारी मार्गाने सरळ निघून जातील व वाहतूक कोंडी होणार नाही. महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाने त्या कामाचे १७० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
द्वारका चौक हा नाशिकमधील केवळ एक वाहतूक चौक नसून, मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नाशिक रोड, पंचवटी, शहराचा मध्यभाग आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मुख्य चौक आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची प्रचंड संख्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे हा चौक कायमस्वरूपी कोंडीचे प्रतीक बनला आहे.
या ठिकाणाहून सिग्नल-फ्री वाहतूक व्हावी, वाहनांसाठी भूयारी मार्ग व्हावा, असा आराखडा महापालिकेच्या वाहतूक विभागाने तयार केला होता. द्वारका चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने हा आराखडा व प्रस्तावास मंजुरी मिळावी म्हणून केंद्र सरकारच्या महामार्ग व रस्ते विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. त्याला तत्वता मंजुरी मिळाल्यानंतर कुंभमेळा विकास प्राधिकरणने त्याला प्रशासकीय मान्यता दिला. या प्रशासकीय मान्यतेच्या अधीन राहून महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाने द्वारका चौकातील वाहतुकीच्या नियमनाबाबत कामाचे १७० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
या टेंडरमधील तरतुदीनुसार नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना द्वारका चौकातसारडा सर्कलकडून द्वारका चौकमार्गे नाशिकरोडकडे जाताना कावेरी हॉटेल ते कराड भत्ता सेंटरपर्यंत ८०० मीटरचा अंडरपास तयार केला जाणार आहे. त्यामुळे द्वारका चौक ओलांडून नाशिक शहरात येणारी वाहने व विरुद्ध दिशेने जाणारी वाहने या भूयारी मार्गाचा वापर करून कुठल्याही अडथळ्याविना नाशिकरोड ते सारडा सर्कल व सारडा सर्कल ते नाशिकरोड विना अडथळा ये जा करू शकणार आहेत.
तसेच धुळे ते मुंबई व मुंबई ते धुळे या मार्गावरून वाहने उड्डाणपुलावरून व या भूयारी मार्गाच्या वरतून नाशिक शहरातील मुंबई नाका ते आडगावनाका व आडगाव नाका ते मुंबईनाका अशी वाहतूक विना अडथळा होऊ शकणार आहे.
याशिवाय नाशिकरोडहून येणा-या वाहनांना पंचवटीकडे वळण घ्यायचे असेल व धुळे मार्गाकडून येणाऱ्या वाहनांना नाशिक शहरात वळायचे असल्यास पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाने द्वारका चौकात धुळेकडून नाशिकरोडकडे व नाशिकरोडहून धुळे मार्गे जाण्यासाठी डावीकडे वळण घेऊन वडाळानाका सिग्नल येथे तीनशे मीटरचे दोन अंडरपास तयार केले जाणार आहेत.
नाशिकरोडकडे जाणाऱ्या भूयारी मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूकही जोडली जाणार असून, वडाळा नाका येथे तीनशे मीटर लांबीचा दुसरा अंडरपास तयार केला जाणार आहे. याच्या उभारणीसाठी द्वारका चौकातील सध्याचे भुयारी मार्ग मात्र तोडावे लागणार आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना वेगवेगळ्या दिशांसाठी अंडरपास व सर्व्हिस रोडचा वापर करता येणार आहे.
नाशिक-धुळे मार्गावर अंडरपासची गरज भासणार नाही. मुंबई, धुळे व नाशिकरोड दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी फॅनिंग पद्धतीने सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांचा वापर करता येणार आहे. यामुळे द्वारका सर्कल सिग्नल फ्री होणार आहे.