नाशिक (Nashik): नाशिक शहरातील वाहतुकीचा अत्यंतवर्दळीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका चौक येथे पुणे बाजूकडे जाणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाला फेब्रुवारीत सुरुवात होणार आहे.
या अंडरपासच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी द्वारका चौकात अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस तसेच सिटीलिंक बसेस यांना एप्रिल अखेरपर्यंत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक शहरात मोठ्यासंख्येने भाविक येणार असल्याने या चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २१४कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
नाशिक शहरात द्वारका चौक येथे मुंबई आग्रा महामार्ग व नाशिक पुणे महामार्ग एकमेकांना मिळतात. यामुळे येथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, त्यानेही वाहतूककोंडीची समस्या तशीच राहिली.
आगामी सिंहस्थात ही समस्या आणखी तीव्र होऊ नये यासाठी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्रालयाने यासाठी २१४ कोटींचा निधी मंजूर केला असून महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून हे काम केले जाणार आहे. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता १ फेब्रुवारीपासून हे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी त्या भागातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली आहेत.
हे काम सुरू झाल्यानंतर द्वारका परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी, यासाठी या भागातील रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक शाखेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नाशिकरोडकडून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना फक्त रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत सिन्नर फाटा, दत्तमंदिर सिग्नल, फेम सिग्नल, रविशंकर मार्ग, वडाळा गाव सर्कल, पाथर्डी फाटा, गरवारे पॉइंट मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ कडे जाणे बंधनकारक राहणार आहे.
सिन्नरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सिन्नरकडे जाण्यासाठी महामार्ग बसस्थानक मुंबई नाका-इंदिरानगर बोगद्यासमोरून साईनाथ चौफुली-वडाळागाव-रहमतनगर-रुंगटा कॅसल डीजीपीनगर-सम्राट चौफुलीवरून पुणे महामार्ग असे जावे लागणार आहे.
पुण्याकडून नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी सम्राट सिग्नल- डीजीपीनगर- कलानगर सिग्नल-लेखानगर चौफुली - गोविंदनगरमार्गे-एबीबी सर्कल येथून त्र्यंबकेश्वरमार्गाकडे जावे लागणार आहे.
मुंबईकडून नाशिकमार्गे धुळे व धुळे येथून नाशिकमार्गे मुंबई ही वाहतूक उड्डाणपुलावरून नियमितपणे सुरू राहणार आहे.
पुण्याकडून धुळे-मालेगाव-गुजरात-पेठ-दिडोरीकडे जाण्यासाठी सिन्नर फाटा-बिटको चौक-जेललरोडमार्गे नांदूर नाका मिरची सिग्नल-स्वामी नारायण चौकमार्गे जाता येईल.