Nashik BJP
Nashik BJP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: उद्योगाला जागा देण्यावरून भाजपमध्ये का पडले दोन गट?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शहरालगतच्या अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रासाठी चुंचाळे शिवारातील पांझरापोळ येथील जागा ताब्यात घेण्यासंदर्भात नाशिक शहरात मत मतांतरे व्यक्त होत आहेत. या मुद्यावरून भाजपमध्येच (BJP) दोन गट पडले असताना या जागेबाबतची वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीने पंधरा दिवसांत यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी मंगळवारी (ता. २१) दिले आहेत. यामुळे पांझरपोळच्या जागेवरून पुढच्या काळात वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

नाशिक महापालिका हद्दीत सातपूर व अंबड या दोन औद्योगिक वसाहती आहेत. या दोन्ही वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारण्यास जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत अतिरिक्त औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मागील आठवड्यात विधिमंडळात पांझरापोळची जागा संपादित करण्याची मागणी केली होती. त्याला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

त्यानंतर त्यांनी मंगळवारी यासंदर्भात मुंबईत बैठक आयोजित केली. या बैठकीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देवगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आदी उपस्थित होते.

पांझरापोळ हा गोपालन संबंधी ट्रस्ट आहे. त्यांच्याकडे अंबड औद्योगिक वसाहतीलगत चारशे हेक्टर जमीन आहे. या जागेचा वापर ते गोपालनासाठी करतात. तसेच उर्वरित जागेवर त्यांनी मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. वाढत्या नाशिक शहरासाठी ही जागा म्हणजे एकप्रकारे ऑक्सिजन पार्क झालेला आहे.

यापूर्वी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची व महाविकास आघाडीची सत्ता असतानाच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी पांझरापोळ ट्रस्ट व नाशिकमधील नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध केला होता.

त्यानंतर आता राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधीमंडळात या जागेवर उद्योग उभारण्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत बैठक घेत अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून या जागेची संपूर्ण चौकशी करणे तसेच त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याची सूचना करण्यात आली.

आमदार देवयानी फरांदे यांनी जागेसंदर्भातील व्यवहार्यता मांडली. त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदीप पेशकार, आशिष नहार, राजेंद्र अहिरे, गोविंद झा, श्रीकांत पाटील, राजेंद्र कोठावदे, सुधाकर देशमुख, निखिल तापडिया, कैलास पाटील यांनी ही जागा शहराच्या मध्यवस्तीत आल्यामुळे या जागेऐवजी दुसरी ग्रामीण भागातील जागा त्यांना देण्यास हरकत नसावी, अशी भूमिका मांडली. तसेच या ठिकाणी असलेली वृक्षवल्ली ही ओपन स्पेसमध्ये दर्शवावी आणि राखीव जागेमध्ये रूपांतरित करून त्याची कुठलीही वृक्षतोड करू नये, असे मत मांडले.

एकीकडे भाजपचे पदाधिकारी असलेले उद्योजक तसेच आमदार देवयानी फरांदे पांझरापोळची जागा उद्योगांना देण्यासाठी आग्रही असतानाच भाजपचेच पदाधिकारी व दुसरे आमदार ही जागा हस्तांतरित करण्याच्या विरोधात आहेत. यामुळे पांझरापोळच्या जागेवरून नाशिकमधील भाजपमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे.