simhastha maha Kumbh Nashik, sadhugram Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिंहस्थात उजळणार नाशिक अन् त्र्यंबकेश्वरचे सौंदर्य; सुशोभिकरणासाठी तज्ज्ञांची समिती

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): केंद्र सरकारने नाशिक येथे रामकाल पथ व राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ या माध्यमातून तीर्थक्षेत्र परिसराचे सौंदर्यीकरण कामे मंजूर केली आहेत. त्यानंतर आता कुंभमेळा प्राधिकरणने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ काळात दोन्ही शहरांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक शहरातील या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. यामुळे शहरातील प्रमुख मार्ग, चौक, गोदा घाट, प्रवेशद्वार, मोकळ्या जागा, पूल आदी परिसराचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहर सौंदर्यीकरण, सुशोभीकरण व नागर रचना विषयक कामे तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली, नियोजनबद्ध व सांस्कृतिक संवेदनशीलतेने करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणअंतर्गत, शहर सुशोभीकरणासाठी आर्किटेक्ट डॉ. प्राजक्ता बस्ते यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.

कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होणार असल्याने, शहराचे सौंदर्य, पर्यावरणीय संतुलन व सांस्कृतिक ओळख जपत, विकास करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक सल्लागार समितीमध्ये सांस्कृतिक वारसा अभ्यासक, दिनेश वैद्य, स्पर्शनीय व अमूर्त वारसा क्षेत्रातील तज्ज्ञ व संवर्धन वास्तुविशारद, समृद्ध मोगल, तसेच कलाकार प्रफुल सावंत यांचा समावेश आहे.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असल्यामुळे शहर सुशोभीकरणाच्या कामांमध्ये पर्यावरण, वारसा संवर्धन, कार्यक्षम शहरी रचना व सौंदर्यदृष्टी, यांचा समतोल राखला जाणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरणच्यावतीने नेमण्यात आलेल्या, सल्लागार संस्थांना संकल्पना मांडणी, आराखडा तयार करणे, नियोजन, निविदा प्रक्रिया व अंमलबजावणी या सर्व टप्प्यांवर तांत्रिक मार्गदर्शन व परीक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. 

गोदावरी नदीकाठावरील घाटांचे सुशोभीकरण व मजबुतीकरण, प्रमुख प्रवेश मार्ग व रस्त्यांचे सौंदर्यीकरण, महत्त्वाच्या चौकांचे शहरी लँडमार्क म्हणून विकास, उड्डाणपूल व पुलांचे सौंदर्यात्मक सुधारणा ही कामे करण्यात येणार असून सोबतच दिशादर्शक फलक व बहुभाषिक सूचना प्रणाली, घाट, सार्वजनिक जागा व वारसास्थळांचे प्रकाशयोजन, साधुग्राम परिसराचे सौंदर्यीकरण, ‘पेंट माय सिटी’सारख्या उपक्रमांतर्गत, भित्तीचित्रे, दर्शनी भागांचे रंगकाम व सार्वजनिक कला प्रकल्प, शहरातील उद्याने, हरित पट्ट्यांचे व विश्रांतीस्थळ येथेही सौंदर्यीकरण केले जाणार आहे. 

तसेच कुंभमेळा मुख्य परिसरासह ५० किलोमीटर परिसरातील महत्त्वाच्या वारसास्थळांचे संवर्धन करण्याचे नियोजन आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याशी निगडित विधी, परंपरा, लोककला, संगीत व मौखिक परंपरांचे दस्तऐवजीकरण व सादरीकरण यावरही भर दिला जाणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले, की सिंहस्थ कुंभमेळा हा एक जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळा आहे, यामुळेच सांस्कृतिक, ऐतिहासिक व जागतिक दर्जाची नाशिक व त्र्यंबक शहर घडविण्याची संधी आहे. यामुळे भाविक व नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि संस्मरणीय अनुभव मिळेल.