Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

106 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांत स्पर्धा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत महापालिकेकडून नाशिक शहरात १०६ चार्जिंग स्टेशन्स (Charging Stations) उभारली जाणार आहेत. शहरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा (Tata), रिलायन्स (Reliance) यासह बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (MNC) रस दाखवला आहे.

नाशिकमध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला जात आहे. नाशिक महापालिकेने शहरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी २० ठिकाणे निश्‍चित केली आहेत.
 
केंद्र सरकारने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी इंधनांचा विचार सुरू केला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण अवलंबले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असताना एवढ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन्सची देखील आवश्यकता भासणार आहे. त्याअनुषंगाने महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्र शासनाने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी देऊ केला आहे. महापालिकेने निधी देऊ केला आहे.

महापालिकेने २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी यादी सादर केली. नॅशनल क्लीन एयर पॉलिसी (एन-कॅप) अंतर्गत नाशिक शहरात ३५ जागांवर चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत. नाशिक महापालिका पहिल्या टप्प्यात ५७ जागा चार्जिंग स्टेशन्ससाठी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात सहभागी झालेल्या कंपन्यांची प्रीबिड मीटिंग झाली. त्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नाशिकमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची तयारी दर्शविली आहे.

यात प्रामुख्याने टाटा पॉवर टायररेक्स ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड, एनर्जी सोल्यूशन्स, रिलायन्स जिओ, बीपी बग, इनोझा लिमिटेड, निना हँड्स, इव्हिगो चार्ज प्रायव्हेट लिमिटेड, रेशनसॅन, टेक इलेक्ट्रिकल्स, राजसन इलेक्ट्रॉनिक्स, एस अँड टी प्रायव्हेट लिमिटेड, पुनम वेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिक एंटरप्राइजेस लॅब्स डब्ल्यू बीआय इंडस्ट्रीज या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांकडून आलेल्या स्वारस्य देकारांवर १७ मे रोजी निर्णय होणार आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स
राजीव गांधी भवन, पश्‍चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर महापालिका जागा, अंबडलिंक रोडवरील महापालिका मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत. या ठिकाणी चारचाकी वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक एक व दोन-तीन चाकी वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्यासाठी प्रत्येकी पाच स्टेशन्स उभारले जाणार आहेत.