Medical College
Medical College Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : मेडिकल कॉलेजसाठी म्हसरूळमध्ये 35 एकर जागा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : बहुचर्चीत नवीन वैद्यकीय पदव्युत्तर शासकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हसरुळ येथे तब्बल ३५ एकर जागा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कपदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीची उभारणी केली जाणार असून येथे १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असेल. विशेष म्हणजे ४३० खाटांचे भव्य रुग्णालयदेखील उभारण्यात येणार आहे.

नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही दोन विद्यापीठे आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचेही काम सुरू आहे. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठ असले तरी विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. यामुळे नाशिकमध्ये वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय व्हावे ही अनेक वर्षांची मागणी होती. ती मागणी मान्य होऊन वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमालाही यंदा सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमही नाशिक येथे सुरू होणार आहे.

या मेडिकल कॉलेजसाठी सरकारने ३४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आला आहे.  मात्र, या दोन्ही महाविद्यालयांसाठी जागेचा मोठा प्रश्न होता. हा प्रश्नही आता निकाली निघाला आहे. या दोन्ही महाविद्यालयांसाठी म्हसरुळ येथील सर्व्हे क्रमांक २५७ अंतर्गत तब्बल ३५ एकर क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबाबतचे शासन प्रकटन २० एप्रिल रोजी काढण्यात आल्याने आता नाशिककरांना हवे असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीची प्रतिक्षाच संपली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भूसे यांनी दिली आहे. पुढील दीड दोन वर्षांत या दोन्ही महाविद्यालयाच्या इमारतींचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

४30 खाटांचे रुग्णालय

सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयांवरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे मनपा, जिल्हा रुग्णालय तसेच माफक दरात मविप्र वैद्यकीय महाविद्यालयातून मिळणाऱ्या सुविधांवरच तान वाढत आहे. आता नाशिककरांना आणखी एक ४३० खाटांचे रुग्णालय उपलब्ध होणार आहे.