Ring Road
Ring Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

चेन्नई-सुरत महामार्गासाठी दिंडोरीतील १७४ हेक्टर भूसंपादनाला सुरवात

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : चेन्नई-सुरत (Chennai-Surat) या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक तालुक्यापाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील ५२ किलेमीटर मार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. यामुळे दिंडोरी तालुक्यातील ५२ किलोमीटर मार्गासाठी लवकरच १७४ हेक्टर क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरत चेन्नई या आठपदरी ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातून ९९६ हेक्टर भूसंपाद करणे प्रस्तावित असून, त्यापैकी नाशिक तालुक्यातील ८३ हेक्टर भूसंपादन प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातून सध्या समृद्धी महामार्गााचे काम सुरू असून त्या पाठोपाठ चेन्नई सुरत हा आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित असून त्यासाठी भूसंपाद प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या तालुक्यांमधून हा महामार्ग जात असून नाशिक तालक्यातील भूसंपदन प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता दिंडोरी तालुक्यातील ५२ किलोमीटर महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या महामार्गामुळे सुरत चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर १२५० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे, तर नाशिक सुरत दरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही औद्योगिकदृष्टया महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.
 दिंडोरी तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मागील वर्षी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली होती. विहित मुदतीमध्ये ६०३ आक्षेप आले होते. या आक्षेपांचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी निराकरण करून ते आक्षेप नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे दिंडोरी तालक्यातील ५२ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी १७४ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आंबेगण, ढकांबे, धाऊर, इंदोरे, जांबुटके, नाळेगाव, पिंपळनारे, रामशेज, रासेगाव, वरवंडी, सिवनई, उमराळे या गावांमधील अधिसूचित केलेल्या जमिनी सर्व बोजा विरहित पूर्ण पणे केंद्र सरकारकडे निहित होणार आहेत.

पाच पट मोबदल्याची मागणी
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागील आठवड्यात या महामार्गाच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यावेळी पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये पर्यावरणाच्या कारणावरून पर्यावरण मंत्रालयाकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला होता. तसेच या महमार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे बाजार भावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी समोर आली होती.

महामार्गाचे वैशिष्ट्य
- ९९६ हेक्टर जमीन करावी लागणार अधिग्रहीत.
- सिन्नरला वावीत समृद्धी महामार्ग परस्परांना भेदणार
- नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी.
- राज्यात राक्षसभवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश.
- अक्कलकोट ( सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक.
- नाशिक ते सोलापूर अंतर ५० किलोमीटरने होणार कमी.