नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारीला वेग देताना Nashik–Trimbakeshwar कुंभमेळा प्राधिकरणाने त्र्यंबकेश्वर, Shirdi तसेच संबंधित जोड रस्त्यांवरील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी ७३१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्र्यंबकेश्वरमध्ये ३९० कोटींचे विकासकामे
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांना सुमारे ३९० कोटी रुपयांची संयुक्त प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दर्शन पथ व घाटांचा विकास, शाही मार्गाचे पुनर्विकास व सौंदर्यीकरण, नागबली विधी भवन व धार्मिक सुविधा, शिवसृष्टीसह उद्यान व सार्वजनिक जागांचा विकास तसेच विक्रेत्यांसाठी नियोजित सुविधा उभारणीचा समावेश आहे.
शिर्डीत रस्ते, पार्किंग सुविधा
शिर्डी येथे २४.५३ कोटी रुपयांच्या रस्ता व पार्किंगविषयक पायाभूत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत होल्डिंग एरिया, पिक-अप व ड्रॉप-ऑफ व्यवस्था, श्री साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि भाविकांच्या गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येणार आहे. कुंभमेळा तीर्थयात्रा परिपथातील महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून शिर्डीत कुंभमेळा वारसा दर्शविणारी स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. तसेच शिर्डी–संगमनेर दरम्यानच्या जोड रस्त्यांच्या विकासासाठी ९२.७५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
घाट, कुंड जतन आणि संगम विकास
त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक कुशावर्त कुंडाच्या जतन व दुरुस्तीसाठी ३.१२ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून, फरशीकरण व छत संरचनेच्या दुरुस्तीचा समावेश आहे. याशिवाय गोदावरी–नंदिनी संगमाजवळ टाकळी येथे ७२.१६ कोटींच्या खर्चाने नवीन घाट उभारण्यात येणार आहे. यामुळे घाटाची लांबी सुमारे ४०० मीटरपर्यंत वाढून प्रमुख स्नान पर्वणीच्या दिवशी भाविकांची क्षमता, सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रण अधिक सक्षम होणार आहे.
वेळेत अंमलबजावणीचे निर्देश
बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग, महावितरण आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी वेळेत अंमलबजावणी, विभागांतील समन्वय आणि सातत्यपूर्ण देखरेखीचे महत्त्व अधोरेखित करत, सिंहस्थ कुंभमेळा २०२७ सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा, असे निर्देश दिले.