Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: 'पीपीपी' मॉडेलद्वारे ड्रायपोर्ट उभारणार; 300 कोटी गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) (JNPA) यांच्यातर्फे नाशिक जिल्ह्यातील निफाड साखर कारखान्याच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित ड्रायपोर्टचा (मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, त्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे, या प्रकल्पात सुमारे ३०० कोटींची गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती 'जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. गेली आठ वर्षांपासून चर्चेच्या पातळीवर असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प आता मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क पुढच्या दोन वर्षांत साकारला जाण्याची आशा निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प 'पीपीपी' तत्त्वावर उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. टेंडर प्रक्रियेनंतर अठरा महिन्यांमध्ये मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारले जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. निफाड कारखान्याच्या १०८ एकर जागेवर उभारले जाणारे मल्टिलॉजिस्टिक पार्क हे जालना व वर्ध्यानंतरचा तिसरा प्रकल्प राहणार असून तो रेल्वे, महामार्ग व कार्गोसेवेने जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून फळे, भाजीपाल्यासह इतर कृषिमालाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.