Jal Jeevan Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Jal Jeevan Mission: नाशिक जिल्ह्यातील 'त्या' 16 गावांना सरकारने दिली गुड न्यूज

जलजीवन मिशन अंतर्गत लासलगाव १६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहर व परिसरातील १६ गावांसाठी राबविण्यात येत असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ यांनी लासलगाव ही नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.

राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूरसह १६ गावे प्रादेशिक योजनेसाठी २०.१० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच रेट्रोफिटिंगअंतर्गत जलजीवन मिशनच्या मानांकनानुसार दरडोई प्रतिदिन ५५ लिटर पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने २६.५५ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सद्या ही योजना नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाच्या अस्तित्वातील स्त्रोतांतून रेट्रोफिटिंगअंतर्गत प्रस्तावित आहे.

या योजनेचे कामपूर्ण झाल्यानंतर लासलगाव व परिसरातील नागरिकांना जलजीवन मिशनच्या मानांकनानुसार दरडोई ५५ लिटर प्रतिदिन नियमित पाणीपुरवठा करता येईलअसेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.