नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मंजूर करण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथे बेलगाव कुऱ्हे - नांदुरवैद्य - साकुरफाटा मार्गाची कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी मागील आठवड्यात तपासणी करून कामाच्या नमुन्यांची जागेवर तपासणी करून सिंहस्थातील कामे दर्जेदार न केल्यास कारवाई करण्याचा संदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.
नाशिक येथे २०२७ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत जवळपास दोन हजार कोटींची कामे मंजूर आहेत. होणार आहेत. नाशिक महापालिका हद्दीत सुरू असलेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामांची कठोर गुणवत्ता तपासणी आणि निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आयआयटी मुंबई यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे संस्थेच्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून शहरात प्रस्तावित प्रमुख रस्त्यांच्या कामांची कठोर गुणवत्ता तपासणी होऊन कामे दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणने जवळपास २५ हजार कोटींचा विकास आराखडा तयार केला असून त्यात नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर नगरपालिका व परिसरात जवळपास १२ हजार कोटींची रस्ता कामे होणार आहेत. या आराखड्यात नाशिक महापालिका हद्दीत दोन हजार कोटींची कामे प्रस्तावित केली असून त्यातील १३०० कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. काहींना कामांचे आदेश मिळाले आहेत, तर उर्वरित लवकरच अंतिम होतील.
नाशिक महापालिकेच्या रस्ते बांधणीचा दर्जा सर्वांनाच रोज अनुभवायला येत असतो. नाशिककर वर्षानुवर्षे खड्डे पडलेल्या रस्त्यांमधून मार्गक्रमण करीत असतात. यामुळे सिंहस्थानिमित्त होत असलेल्या दर्जाबाबत वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी कामांच्या गुणवत्तेला महत्व दिले असून त्यांनी इगतपुरी तालुक्यात सिंहस्थानिमित्त सुरू असलेल्या कामाची तपासणी केली.
या कामाच्या नमुण्याच्या तपासणी अहवालानंतर कारवाईचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनेही गुणवत्तेकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थनिधीतील रस्ते उच्च गुणवत्तेचे होण्यासाठी नाशिक महापालिकेने रस्त्यांच्या बांधकामादरम्यान निरीक्षण आणि तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना गुणवत्ता तपासणी आणि निरीक्षणात मदत करतील. या सहकार्याचा भाग म्हणून, आयआयटी मुंबईने सोमवारी मुंबईत नाशिक माहपालिकेतल अभियंत्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली.
या कार्यशाळेत रस्त्यांच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी व्यावहारिक दृष्टिकोनांवर भर देण्यात आला. या कार्यशाळेत साहित्य चाचणी, स्थळावरील मूल्यमापन पद्धती, फील्ड टेस्ट, प्रयोगशाळा प्रक्रिया आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रस्त्यांच्या पृष्ठभागासाठी मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश होता. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रदीप चौधरी आणि शहर अभियंता संजय अग्रवाल या कार्यशाळेस उपस्थित होते. प्रात्यक्षिकांमध्ये फील्ड टेस्ट, प्रयोगशाळा प्रक्रिया आणि दीर्घकाळ टिकाऊ रस्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
कार्यशाळेमुळे रस्ताकामांचे निरीक्षण करणे सोपे होईल व गुणवत्ता-संबंधित समस्या कमी होतील आणि शहरातील प्रमुख रस्त्यांचा टिकाऊपणा वाढणार असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या कार्यशाळेनंतर महापालिका प्रशासनाने आता आयआयटी मुंबई सोबत रस्ते गुणवत्ता तपासणीसाठी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे.