Samruddhi Expressway
Samruddhi Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : अपघात टाळण्यासाठी प्रत्येक 25 किमीवर उभारणार रबरी गतिरोधक 

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मुंबई ते नागपूर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणार्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मागील वर्षभरात ८० अपघात झाले आहेत.  एकसारख्या गतीमुळे वाहन चालकाला ‘हायवे हिप्नॉसिस’ होऊन त्यातून अपघात घडतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून अपघात टाळण्यासाठी प्रत्येकी २५ किलोमीटरला रबलिंग स्टेप्स्‌ (रबरी गतिरोधक) बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. याशिवाय प्रत्येक पाच किलोमीटरवर लक्षवेधी चित्र, शिल्प उभारण्यात येत असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड यांनी नांदगाव सदो येथे समृद्धीच्या २५ किलोमीटर अंतराच्या लोकार्पणप्रसंगी दिली.

नागपूर ते मुंबई हा ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग उभारण्यात येत आहे. त्यातील ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ ला झाले. त्यानंतर शिर्डी ते  इगतपुरी तालुक्यातील भरवीर या ८० किलोमीटरचा दुसरा टप्पा २६ मे २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला झाला. त्यानंतर भरवीर ते नांदगाव सदो हा २५ किलोमीटर मार्गही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरम्यान एकसारखा रस्ता आणि तासी वेग १२० किलो मीटरपर्यंत वाढवण्याची अनुमती असलेल्या या रस्त्याची अल्पावधीत प्रसिद्धी झाली. डिसेंबर २०२२ ते मार्च २०२४ या कालावधीत ८० लाख वाहनांनी ‘समृद्धी’वरून सुरक्षित प्रवास केला.

मात्र, वाहन चालक व वाहनांच्या तांत्रिक चुकांमुळे ८० वाहनांचा अपघात या महामार्गावर झाला. त्यात १६६ व्यक्तींचा मृत्यू झाला. याची कारणमिमांसा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केली असून, त्या टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून समृद्धीवर प्रत्येकी २५ किलोमीटरला एक रबलिंग स्टेप्स अर्थात रबरी गतिरोधक तयार करण्यात येतील. या रबरी गतिररोधकांचा गाडीच्या वेगावर काहीच परिणाम होणार नाही. पण गाडीतील चालक व प्रवाशांची झोपमोड होण्याइतपत सौम्य धक्के त्यांना बसणार आहेत. याशिवाय प्रत्येकी पाच किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या कलाकृतीचे शिल्प उभारण्यात येणार आहेत. ज्याकडे बघितल्यानंतर प्रवासी आश्चर्यचकित होऊन त्यावर विचार करतील, असा यामागचा हेतु आहे. यासाठी या महामार्गाच्या कडेला असलेल्या भिंतींवर सुंदर चित्र रेखाटले जात आहेत. यातून ‘हायवे हिप्नॉसिस’ कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा डॉ.गायकवाड यांनी केला आहे. 

असा आहे समृद्धी महामार्ग

७०१ कि.मी. : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे अंतर 

१२० मीटर : रस्त्याची रुंदी

५२० कि. मी. : पहिला टप्पा (११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण)

८० कि. मी. : दुसरा टप्पा (२६ मे २०२३ रोजी लोकार्पण)

२५ कि. मी. : तिसरा टप्पा (४ मार्च २०२४ रोजी लोकार्पण)

७६ कि. मी. : अंतिम टप्पा (ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रस्तावित)