Ambulance
Ambulance Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक ZPचा चांगला निर्णय; रुग्णवाहिकांची संख्या वाढणार, टेंडरही...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका (Ambulance) खरेदीसाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) आरोग्य विभागाने 9 रुग्णवाहिका खरेदीसाठी जीइएम पोर्टलवर दीड कोटींचे खरेदी टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरनंतर वनविभागाने दिलेल्या निधीतून आणखी दोन रुग्णवाहिका खरेदी केल्या जाणार आहेत. या खरेदीनंतर आरोग्य विभागाच्या ताफ्यात मागील दोन वर्षांत नव्याने आलेल्या रुग्णवाहिकांची संख्या 72 होणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत 111 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक रुग्णवाहिका दिली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्यानंतर सरकारकडून नवीन रुग्णवाहिकांसाठी निधी न मिळाल्यामुळे आरोग्य विभागाने सीएसआर निधीतून रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न केला. ओझर येथील एचएएल उद्योगाने चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाच्या रकमेतून जवळपास सहा कोटींच्या निधीतून रुग्णवाहिका घेण्यास आरोग्य विभागाला परवानगी दिली. त्या निधीतून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जवळपास 32 रुग्णवाहिका खरेदी केल्या.

मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या दीड कोटी निधीतून नऊ रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असून, त्यासाठी जीइएम पोर्टलवर टेंडर प्रसिद्ध केले आहे. वन विभागाने दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाला यापूर्वीच निधी दिला असून, या टेंडरमध्ये निश्चित होणाऱ्या दरांमध्ये त्या दोन रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार आहे.

ताफ्यात 72 रुग्णवाहिका

आरोग्य विभागाच्या नव्या खरेदीनंतर त्यांच्याकडील नव्या रुग्ण वाहिकांची संख्या 72 होणार आहे. त्यापैकी 15 रुग्णवाहिका सीएसआर निधीतून मिळाल्या असून, उर्वरित 57 रुग्णवाहिका सरकारच्या वेगवेगळ्या लेखाशीर्ष खालील निधीतून खरेदी केल्या आहेत.