Surat -Chennai Expressway
Surat -Chennai Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड;जमिनीच्या दराबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : चेन्नई-सुरत (Chennai-Surat) या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यांमधील भूसंपदनाबाबत दाखल दावे आणि हरकतींवर जानेवारी अखेरपर्यंत निर्णय द्यावा व ते दावे निकाली काढावेत, असे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. दिले होते.

दरम्यान केंद्रीय रस्ते व वाहतूक विकास मंत्रालयाकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत सीपीआय रेडस्टार या संघटनेकडून निदर्शने करण्यात आली. महामार्ग मंत्रालयाकडून बागायती जमिनींना जिरायती दाखवल्या जात आहेत. तसेच या जमिनींच्या दराबाबत अधिकाऱ्यांकडून काहीही माहिती दिली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाबाबत संभ्रम असदल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगितले जात आहे.  

केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड महामार्ग साकारला जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यातून जाणार असून नाशिक जिल्ह्यातील सुरगारा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालुक्यांतील जमिनी या महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने नाशिक, निफाड, सिन्नर व दिंडोरी या चार तालुक्यांमधील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण, मोजणी आदी प्रक्रिया सुरू होत्या. सुमारे आठ महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय शेतांमध्ये सॅटेलाइट मार्कर बसवण्यात आल्या आहेत. यानंतर प्रांतांच्यावतीने संबंधित तालुक्यांमध्ये पार पडलेल्या सुनावणी दरम्यान केवळ नोंदणी संदर्भातील हरकती मागवल्या गेल्या. यात शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत विचारणा करूनही खुलासा करण्यात आलेला नाही. शासन दरबारी बागायती जमिनींची जिरायती, अशी नोंद करण्यात आली. या महामार्गावर पाण्याचा निचरा होण्याची शक्यता नसल्याने पुढील काळात उत्पन्न घेता येणार नाही. मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीमुळे प्रदूषण पातळीत वाढ होऊन कृषी उत्पादनास याचा फटका बसेल. एलिवेटेड रस्ता बांधला जाणार असल्याने तेथे रोजगार निर्मिती शक्यच होणार नाही, या सर्व समस्या विचारात घेऊन मुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांनी संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून जगण्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महामार्गाची वैशिष्ट्ये
-
या महामार्गामुळे नाशिक सुरत दरम्यानचे अंतर १७६ किलोमीटरवर येणार
- नाशिक ते सोलापूर अंतरात ५० किलोमीटरची कपात होणार आहे
- या महामार्गामुळे सुरत चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर १२५० किलोमीटरपर्यंत कमी होणार.
- सुरत, नाशिक अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.