Chagan Bhujbal
Chagan Bhujbal Tendernama
उत्तर महाराष्ट्र

भुजबळांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शिंदे सरकारकडून मोठा निधी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालातील 1498.61 कोटी रुपयांना जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे मांजरपाडासह (देवसाने) वळण योजनांच्या कामांना मिळणार गती मिळणार आहे. या निर्णयामुळे दरसवाडीकालवा, 11 वळण योजना यासह ओझरखेड कालव्यांची कामे पूर्ण होणार आहेत.

मागील महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.3) सरकारकडून चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास 1498.61 कोटी रुपये किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा 6 प्रकल्पांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे करंजवण, वाघाड, ओझरखेड व पुणेगांव या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर 11 प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. दरसूचीतील वाढ, भाववाढ, संकल्पनातील बदल, भूसंपादनाची दरवाढ व इतर कारणांमुळे झालेली वाढ यामुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाने चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास सादर केला होता. याबाबत विधिमंडळ अधिवेशनात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उर्ध्व गोदावरी प्रकल्पास 1498.61 कोटी रुपये सुधारित प्रशासकिय मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याप्रमाणे आश्वासन दिले. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मान्य करीत त्यासाठी वाढीव 580.88 कोटी रुपये निधी देण्यास मान्यताही दिली आहे. यामुळे मांजरपाडा व इतर वळण योजना मार्गी लागणार आहेत.

सरकारी निर्णयानुसार मंजूर केलेल्या वाढीव निधीतून नाशिक जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांसाठी 100 कोटी, कोटी, देवसाणे मांजरपाडा प्रकल्पासाठी   157 कोटी,  ओझरखेड प्रकल्पासाठी 28.18 कोटी, दरसवाडी पोहोच कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी एकूण 115 कोटी, व अनुषंगिक खर्चापोटी  सहा कोटी असे 580 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आलेली आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पास मिळालेल्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेने  येवल्यातील मांजरपाडासह जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.