Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक रोड रेल्वे स्थानकात ई-चार्जिंग स्टेशन अन् जपानी पद्धतीची...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये व नाशिक शहरातही सर्वात प्रथम विजेची वाहने चार्ज करण्यासाठी ई चार्जिंग स्टेशन नाशिक रोड रेल्वे स्थानकात सुरू होणार आहे. तसेच रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी जपानी पद्धतीची छोटी, सुरक्षित, स्वच्छ पॉड हॉटेल्सही उभारली जाणार आहेत. 

नाशिक शहरात ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेकडे जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार महापालिका जागा निश्चित करीत असतानाच मध्य रेल्वेने नाशिक शहरात पाहिले ई चार्जिंग स्टेशन चालवण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.  याबरोबरच नाशिकरोड स्थानकातच रेल्वे कोचमध्ये हॉटेलही (कोच व्हील रेस्टॉरंट) लवकरच सुरू होणार असून, ठेकेदाराला टेंडर देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड स्थानकावर स्लीपिंग पॉड्स (पॉड हॉटेल) हे ६०० चौरस फुटांत उभारले जातील. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ते विकसित करण्यात येणार असून, ते चालविण्यासाठी आरक्षित किंमत (लायन्सस फी) दोन लाख १७ हजार ३९३ रुपये असणार आहे. रेल्वेने २७ सप्टेंबरला 'आयआरईपीएस'वर टेंडर अपलोड केले असून तांत्रिक लिफाफा २१ ऑक्टोबरला उघडला जाईल. पॉड हॉटेलमुळे रेल्वे प्रवाशांचा मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च वाचणार आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील दुचाकी पार्किंगचे टेंडर दहा ते पंधरा लाखांना दिले जाते. त्या तुलनेत ई व्हेइकल चार्जिंग स्टेशनला फक्त चार लाख भाडे राहील. सुभाषरोड दुचाकी पार्किंगजवळ हे स्टेशन उभारले जाईल. त्यासाठी १४८.६४ चौरस मीटर क्षेत्र ठेकेदाराला दिले जाईल. तो त्यात कितीही चार्जिंग पॉइंट उभारू शकेल. या जागेसाठी प्रतिवर्ष किमान तीन लाख ९१ हजार ६९ रुपये लायन्स फी राहील. दुचाकी व चारचाकी मालक शुल्क देऊन वाहन चार्ज करू शकतील. लायन्स फीवरील नफा रेल्वे आणि ठेकेदारात वाटला जाईल. ई चार्जिंग स्टेशनचे टेंडर 'आयआरईपीएस वर अपलोड केले आहे.