Dr. Pulkunwar Nashik
Dr. Pulkunwar Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

तारीख पे तारीख-रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदारांना तिसऱ्यांदा अल्टीमेटम

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : दोन वर्षांत साडेसहाशे कोटी रुपयांचा खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी ठेकेदारांना तातडीने रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचाही इशारा दिला होता. त्यात आधी गणेशोत्सव, नंतर दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या तंबीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची नवीन मुदतवाढ दिली आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना नादुरुस्त रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असूनही महापालिका ठेकेदारांना केवळ नोटिसा पाठवण्याचे सोपस्कार पार पाडत असून, प्रत्यक्षात कारवाईचे धाडस होत नसल्याने महापालिकेच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

पावसाळा उघडल्यानंतर दिवाळींनतर रस्त्यांच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला असून, अजूनही अनेक भागातील रस्त्यांवरील खड्डे कायम आहे. खड्डे बुजताना ठेकेदारांनी केवळ रस्त्याला ठिगळ जोडण्याचे काम केले असून, त्यामुळे वाहने चालवताना त्रास होत आहे. नाशिकमध्ये राज्यपाल व मुख्यमंत्री यांचा दौरा असल्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्व संबंधित ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांना रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना केल्या. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील उपस्थित होते.

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठेकेदारांना नोटीस बजावून दोष निवारण कालावधीतील रस्ते दुरुस्त न झाल्यास काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाकडून जवळपास १४ ठेकेदारांना नोटीस बजावण्यात आली. महापालिका आयुक्तांनी ठेकेदारांना सुरवातीला गणेशोत्सवापूर्वी व नंतर दिवाळीपूर्वी रस्ते दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. मात्र, पाऊस सुरूच राहिल्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी टाकलेला मुरूम पावसामुळे वाहून गेल्याने हा खड्डे भरण्याचा प्रकार हास्यास्पद झाला. त्यात काही ठिकाणी पेव्हरब्लॉक टाकण्याचा उपाय केला, पण तो उपाय कमी आणि अपाय जास्त झाला.

परिणामी महापालिकेतर्फे तयार करण्याच्या आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता हा विषय चव्हाट्यावर आला आहे. यामुळे पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाने ठेकेदारांची बैठक घेत ठेकेदारांना नव्याने अल्टिमेटम दिला आहे. ठेकेदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत तसेच दोष निवारण कालावधीतील रस्ते दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी सर्व मक्तेदारांना खड्डे बुजविण्याची यादी देण्यात आली. तसेच कामाची गुणवत्ता राखण्याच्या सूचना करण्यात आल्या.