Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक: मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन बैठकीत बांधकाम टेंडरवरून खडाजंगी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : ज्ञानगंगा घरोघरी असे घोषवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत शैक्षणिक निर्णयाऐवजी बांधकामांच्या टेंडरवरून खडाजंगी झाली. प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील हे बैठकीला ऑनलाइन नव्हे तर प्रत्यक्षात उपस्थित असावे, त्यांच्या कार्यकाळातील विद्यापीठात झालेली विविध बांधकामे, दुरुस्तीची कामे, पदभरतीच्या चौकशीची मागणी मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्यांनी लावून धरल्याने बराच काळ गोंधळ झाला.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाची सभा नुकतीच झाली. या सभेला प्रभारी कुलगुरू ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सदस्यांनी कुलगुरू आणि कुलसचिव दोन्ही पदे प्रभारी असल्याने नाराजी व्यक्त केली. विद्यापीठ विश्रामगृहाच्या इमारतींसह त्यांच्या कार्यकाळात झालेल्या इतर पाच कोटींच्या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार सुहास कांदे यांनी लावून धरली. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बैठकीला हजेरी लावत कामांच्या तपासणीस सहमती दर्शविली.

माजी कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी मंजूर केलेल्या मुक्त विद्यापीठाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी 4.50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार सरोज आहेर यांनी केली. त्यावर कुलगुरू डॉ. पी. जी.पाटील यांनी ही विद्यापीठाची मालमत्ता नसून शासनाकडून निधी मंजूर करून आणावा असे मत व्यक्त केले. विद्यापीठात कुलगुरूंच्या विशेष अधिकारात 6 महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्ती करता येते. जुन्या कर्मचार्‍यांना मुदतवाढही देता येते. पण, विद्यमान कुलगुरूंनी मात्र नव्याने कंत्राटी कर्मचारी नियुक्ती देताना ते कुठे कार्यरत आहेत याची विचारणा करूनच नियुक्ती दिली आहे. अनेकांना यातून घरचा रस्ता दाखविल्याने त्यावरूनही मंडळ सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.