Corruption
Corruption Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : टोल प्लाझाचे टेंडर घेण्यासाठी सात लाखांची लाच घेताना अटक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : धुळे तालुक्यातील लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी टेंडर मंजूर करण्यासाठी सात लाख रूपयांची लाच स्वीकारताना इरकॉन सोमा टोल वे या कंपनीच्या अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने लळिंग टोल प्लाझाजवळील मुख्य कार्यालयात रंगेहात पकडले आहे.

हरीश सत्यवली असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, लाचखोरासह इरकॉन सोमा टोल वे या कंपनीच्या संचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हरीश सत्यवली यास अटक करण्यात आली आहे. केवळ सरकारी कार्यालयांमधील टेंडर मंजुरीसाठी लाच घेतली जाते, असा गैरसमज या प्रकरणामुळे दूर झाला आहे.

नवी दिल्ली येथील इरकॉन सोमा टोल वे प्रा. लि. कंपनीने राजस्थानमधील उदयपूरच्या कोरल असोसिएटस या कंपनीस २२ ऑगस्ट २०२२ ला मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड (जि. नाशिक) येथील टोल प्लाझाच्या संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा करार केलेला आहे. कंपनीने तक्रारदाराला २५ ऑगस्ट २०२२ ला मुखत्यारपत्राद्वारे टोल प्लाझा, चांदवड येथील संपूर्ण व्यवस्थापन व त्यासंबंधी कागदोपत्री अधिकार प्रदान केले आहेत. तक्रारदाराने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापनाबद्दलच्या डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ कालावधीतील प्रतिपूर्तीची रक्कम अदा केली आहे. कोरल असोसिएटसने चांदवड येथील टोल व्यवस्थापनानंतर लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी टेंडर भरले आहे.

मात्र, ते टेंडर मंजूर करण्यासाठी इरकॉन सोमा टोल वे या कंपनीचे हिशेबनीस व वित्त अधिकारी हरीश सत्यवली याने सात लाख रूपयांची मागणी केली. त्याने इरकॉन सोमा टोल वे कंपनीचे चे नवी दिल्लीस्थित संचालक प्रदीप कटीयार यांच्या सांगण्यावरुन कटियारसाठी दोन लाख रुपये तसेच स्वतःसाठी पाच लाख, अशी एकूण सात लाखांची लाच मागितली, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. लळिंग येथील इरकॉन सोमा टोल वे येथील मुख्य कार्यालयात हरीश सत्यवली मंगळवारी (ता. २१) दुपारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.