Job
Job Tendernama
उत्तर महाराष्ट्र

मोठी भरती; नाशिक झेडपी फेब्रुवारीत भरणार 2 हजार जागा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट क संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत (Nashik ZP) गट क संवर्गातील २५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २०३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एक ते सात फेब्रुवारी दरम्यान भरतीची (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतीम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला असून त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागांच्या गट क व गट ड या संवर्गाच्या २ हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये २ हजार ५३८ जागा या गट क मधील आहेत, तर १८८ जागा गट ड मधील आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधीलू सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील गट क संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण २७२६ जागा रिक्त असून त्यात गट ड मधील १८८ जागा रिक्त आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने गट ड ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट क संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे २५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया नाशिक जिल्हा परिषद निवड मंडळाच्या माध्यमातून राबवणार असल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

असे आहे वेळापत्रक

बिंदू नामावली, रिक्त जागांच्या संख्येनुसार आरक्षण निश्‍चित करणे, भरती प्रक्रियेसाठी कंपनी निवड करणे : ३१ जानेवारी २०२३ पर्यंत

पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे : १ ते ७ फेब्रुवारी २०२३

उमेदवारी अर्ज मागवणे : ८ ते २२ फेब्रुवारी २०२३

उमेदवारी अर्जांची छाननी : २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३

पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे : २ ते ५ मार्च २०२३

उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करणे : ६ ते १३ एप्रिल २०२३

परीक्षा आयोजन : १४ ते ३० एप्रिल २०२३

निकाल व नियुक्त्या देणे : १ ते ३१ मे २०२३