Aurangabad
Aurangabad Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Aurangabad:धोकादायक विहीर दुरुस्तीसाठी लेखाधिकाऱ्यांना पाझर फुटेना

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादेतील मुकुंदवाडी भागात संघर्षनगरात एक अत्यंत  धोकादायक विहीर आहे. या विहिरीच्या दुरुस्तीसाठी झोन क्रमांक - ६ चे शाखा अभियंता मधुकर चौधरी, अनिल गायकवाड यांनी १३ ऑगस्ट २०२२ रोजी २० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर प्रभाग अभियंता राजीव संधा यांच्या मंजुरीनंतर तांत्रिक मान्यतेसाठी  कार्यकारी अभियंता भागवत फड व शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे प्रस्ताव पाठवन्यात आला होता. अतिआवश्यक आणि जनहिताचे काम म्हणून त्यांनी तातडीने तांत्रिक मान्यता दिली. मात्र लेखाविभागाचे मुख्या लेखाधिकारी सुभाष वाहुळ आणि लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडे गत चार महिन्यांपासून वित्तीय मान्यतेसाठी हा दुरुस्तीचा प्रस्ताव रखडल्याचे झोन अधिकारी मधुकर चौधरी आणि अनिल गायकवाड यांचे म्हणणे आहे.

बळी गेल्यावर वित्तीय मान्यता देणार काय?

इकडे दुरुस्तीसाठी तगादा लावणाऱ्या संघर्षनगरवासीयांना प्रभाग अभियंता राजीव संधा  आश्वासनाचे लॉलिपॉप देत आहेत. मात्र मुख्यालय स्तरावरच हा प्रस्ताव चार महिन्यांपासून लालफितीत अडकल्याचे समोर आले आहे. एखाद्याचा बळी गेल्यावरच विहीर दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मुख्य लेखाधिकारी सुभाष वाहूळ मंजुरी देणार काय, असा सवाल लेखा विभागाच्या दप्तरदिरंगाई कारभाराने समोर आला आहे. मात्र आता या कामासाठी या भागातील माजी नगरसेवक तथा प्रभाग सभापती यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. 

काय आहे नेमके प्रकरण?

औरंगाबादेतील सिडको एन - २ मुकुंदवाडी येथील सर्व्हे नंबर १७ / २२ समोर वार्ड क्रमांक ८७ झोन क्रमांक - ६  संघर्षनगर येथील दाट वसाहतीच्या चौराहाच्या मधोमध मुकुंदवाडी गावठाणातील एक जुनी विहीर आहे. या विहिरीचा वापर गणेश विसर्जनासाठी केला जातो. विहिरीत खालून मुबलक पाणी, गाळ आणि वरून गणेशमूर्ती तसेच निर्माल्याचे ढीग साचले आहेत. विहिरीला जाळी नसल्याने आजूबाजूच्या वसाहतीतील लोकांचा  देखील झाडांचा पालापाचोळा आणि कचरा साठून विहीर बुजू लागली आहे. तसेच विहीरीचा कठडा पडल्याने परिसरातील आबालवृद्धांसाठी ही वि‌हीर धोकादायक ठरत आहे.

असा आहे धोका? 

विहिरी‍शेजारी पारावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय असून तेथे परिसरातील जेष्ठ नागरीकांची सतत वर्दळ असते. या विहिरीच्या परिसरामध्ये आजुबाजुच्या परिसरातील लहान मुले सातत्याने खेळत असतात. चुकूनही कोणाचा तोल गेला तर दुर्घटना घडू शकते. विहिरीला पाणी असल्यामुळे हा धोका अधिक आहे. 

काय आहे मागणी?

निसर्गाने दिलेला हा जीवनाचा जीवंत ठेवा जतन करण्यासाठी येथील गणेश विसर्जन बंद करावे. दुष्काळात सांडपाण्यासाठी व परिसरातील उद्यानांसाठी पाण्याचा वापर करता येईल. उन्हाळ्यात आरोहाद्वारे पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी देखील उपलब्ध करता येईल. यासाठी या गोलाकार विहिरीतील गणेशमूर्ती, निर्माल्य तसेच गाळ कचरा काढण्यात यावा, खोलीकरण करून चारही बाजुने विटांमध्ये बांधकाम करण्यात यावे. जीवंत झरे मोकळे करण्यात यावेत, कठड्याची उंची वाढवून वरून जाळी टाकण्यात यावी. कठड्याच्या बाजुने तारेचे कुंपण बसविण्याची मागणी माजी सभापती तथा नगरसेवक मनोज बंन्सीलाल गांगवे यांनी गत पाच वर्षांपासून मनपाकडा लावून धरली आहे.

मनपाचे दुर्लक्ष

सातत्याने मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत गांगवे यांनी व्यक्त केली. निदान विहिरीचा तूटलेला कठडा बांधल्यास लहान मुलांना असणारा धोका तर टळणारच आहे, पण त्याचसोबत विहिरीत कचरा तसेच पालापाचोळा जाण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. यामुळे पाण्याचा चांगला स्त्रोतही उपलब्ध होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. दुरुस्तीसाठी आम्ही आत्तापर्यंत गांधीगिरी मार्गाने थकलो; परंतु आता काम मार्गी लावण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे आहेत जबाबदार? 

अगदी रस्त्याच्या कडेलाच कठडा कोसळून खिंडार पडलेल्या विहिरीत भविष्यात कुठलीही जीवीत वा वित्त हानी झाल्यास वार्ड अभियंता तथा कार्यकारी अभियंता राजीव संधा , उप अभियंता मधुकर चौधरी, शाखा अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता भागवत फड, मुख्यालेखाधिकारी सुभाष वाहूळ, सहाय्यक मुख्यालेखाधिकारी संजय पवार तथा प्रशासन प्रमुख डाॅ. अभिजित चौधरी हेच जबाबदार आहेत