Surat -Chennai Expressway
Surat -Chennai Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

चेन्नई-सुरत महामार्गासाठी पेठ, सुरगाणा वगळता 512 हेक्टर अधिसूचित

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : चेन्नई-सुरत या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी (Chennai - Surat Greenfield Highway) नाशिक, दिंडोरी पाठोपाठ निफाड व सिन्नर तालुक्यातील संपादन करण्याच्या जमिनीची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. यामुळे या महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या 996 हेक्टरपैकी 512 हेक्टर क्षेत्र अधिसूचित झाले आहे. उर्वरित क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील असून पर्यावरण मंत्रालयाने अद्याप त्याच्या भूसंपादनासाठी ना हरकत दाखला दिलेला नाही. 

चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड हा आठ पदरी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या सहा तालुक्यांतून जातो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये नाशिक तालुक्यातील 83 हेक्टर क्षेत्र अधिसूचित करून भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन महिने इतर क्षेत्रासाठी काहीही हालचाल झाली नाही.

दरम्यान मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पेठ व सुरगाणा तालुक्यात भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळत नसल्याचे लक्षात आणून दिले. त्यावर राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उर्वरित क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया राबवा, पेठ, सुरगाणा भागातील परवानगीसाठी मी संबंधित विभागाशी चर्चा करते, असे सांगितले. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तातडीने कार्यवाही करीत दिंडोरी तालुक्यातील 12 गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार 174 हेक्टर क्षेत्र अधिसूचित करीत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सिन्नर व निफाड तालुक्यातील 255 हेक्टर क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

त्यानुसार नाशिक तालुक्यात 83 हेक्टर, दिंडोरी तालुक्यात 174 हेक्टर व सिन्नर, निफाड तालुके मिळून 255 असे 512 हेक्टर क्षेत्र अधिसूचित जाहीर झाले आहे. यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया राबवताना जिरायती, बागायती, बिनशेती जमिनी, अधिसूचित क्षेत्रावरील फळबागा, झाडे, घरे व इतर बांधकामे यांचे मूल्य निर्धारण करण्यात येईल. या अधिसूचित क्षेत्राची मालकी असणाऱ्या जमीन मालकांना आता खरेदीसाठी नोटिसा पाठवण्यात येतील.

पाच पट मोबदल्याची मागणी

या महमार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे बाजार भावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी केलेली असून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यापूर्वीच महाराष्ट्र, तेलंगण, तामिळनाडू या राज्यांमधील भूसंपादन प्रक्रियेचा अभ्यास करून एक सूत्र तयार केले आहे. यामुळे जमिनीचा मोबदला हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

या महामार्गामुळे सुरत चेन्नई हे 1600 किलोमीटरचे अंतर 1250 किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे, तर नाशिक सुरत दरम्यानचे अंतर अवघे 176 किलोमीटरवर येणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत, अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. 

महामार्गाची वैशिष्ट्ये

- नाशिक जिल्ह्यात 996 हेक्टर जमीन करावी लागणार अधिग्रहीत

- सिन्नरला वावीत समृद्धी महामार्ग परस्परांना भेदणार

- नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यात प्रकल्पाची उभारणी

- राज्यात राक्षसभवन (ता. सुरगाणा) येथे प्रवेश

- अक्कलकोट (सोलापूर) येथे राज्यातील शेवटचे टोक

- नाशिक ते सोलापूर अंतर 50 किलोमीटरने होणार कमी