Godavari River
Godavari River Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : वाराणसीच्या धर्तीवर आता गोदावरीची आरती; 42 कोटींचा आराखडा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्येही नियमित गोदा आरती सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या उपक्रमासाठी ४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात दहा कोटींच्या खर्चाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.

गोदा आरती हा अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला उपक्रम आहे. पर्यटन विकास महामंडळाने यापूर्वी गोदा आरतीसाठी काही साहित्य खरेदी करून ते पुरोहित संघाकडे दिले. त्यानुसार रोज सायंकाळी आरती होत असल्याचे पुरोहित संघाकडून सांगितले जात असले तरी याबाबत कोणाला फारशी माहिती नसल्याचे दिसत आहे. यामुळे गोदा आरती भव्य प्रमाणात व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर गोदा आरती उपक्रमाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील सर्व आमदार व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर 'गोदावरी आरती उपक्रम राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने गेल्या पंधरवड्यात घेतला होता. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात आरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. आठवडाभरात पहिल्या टप्प्यातील कामासाठीच्या खर्चाला राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार फरांदे यांनी सांगितले. रामकुंडातील कॉक्रिटीकरण तोडण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. नीरीच्या सूचनेनुसार केवळ अहवाल दिला आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण मुक्तीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असे स्पष्टीकरण आयुक्त पुलकुंडवार यांनी दिले. सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे पावित्र्य आणि संवर्धन, भाविकांची सुरक्षितता, न्यायालयाचे आदेश याप्रमाणे  कार्यवाही होईल,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

दोन टप्प्यात प्रस्ताव

गोदा आरती सुरू करण्यापूर्वी गोदावरी स्वच्छता करावी, अशी भूमिका असणारा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार मलनिस्सारण केंद्रासह शुद्धीकरणाचा प्रस्ताव तयार केला जावा. पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण केंद्रासह मूलभूत सुविधांचा आराखडा तयार केला जावा.म्हणजे पहिल्या टप्प्याच्या आराखड्यात स्थापत्य विषयक कामांचा आराखडा तयार केला जावा. त्यानंतर रोषणाई आणि सजावटीचा आराखडादुसऱ्या टप्प्यात तयार केला जावा.  गोदावरीची स्वच्छता तसेच प्लॅटफॉर्म, रोषणाई यासह ४२ कोटीचा आराखडा तयार करण्यात यावा,  असा निर्णय झाला.