UT Kharadi Bypass
UT Kharadi Bypass Tendernama
पुणे

'हा' नवा प्रयोग रोखणार का पुण्यातील 'टी-जंक्शन' वरील अपघात?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : रस्त्यावर होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी व अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी खराडी बाह्यवळण येथे टॅक्‍टिकल अर्बनिझमचा (UT) प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यामुळे पादचारी, सायकलस्वार व अन्य लोकांसाठी उपयुक्त ठरू लागले आहेत. सेव्ह लाइफ फाउंडेशन, स्कोडा ऑटो वोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आणि पुणे महापालिका, वाहतूक पोलिस यांच्यावतीने हा प्रयोग करण्यात आला आहे.

काय निवडला चौक?
- खराडी बाह्यवळण चौक हा ‘टी जंक्‍शन’ म्हणूनही ओळखला जातो
- तेथे पुणे-अहमदनगर बाह्यवळण रस्ता व मगरपट्टा येथे जोडणारा रस्ता आहे
- याच ठिकाणच्या चौकात २०२१ मध्ये १० अपघात झाले होते
- त्यामध्ये दोन मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले होते
- या पार्श्वभूमीवर सेव्ह लाइफ फाउंडेशनने संबंधित ठिकाणी घडणाऱ्या अपघातांच्या घटनांचा अभ्यास केला
- १६ डिसेंबरपासून काही उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले

पाहणी करून शिफारशी
रुंद रस्ता, सुरक्षित पदपथ, रहदारी ठिकाणे, पादचाऱ्यांना थांबण्यासाठीची व्यवस्था, प्रशस्त पादचारी प्रवेश मार्ग, लहान क्रॉसिंग या उपाययोजना राबविण्यावर भर दिला. याबरोबरच लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग व पार्किंगसाठी जागाही तयार करण्यात आली. आठवडाभर पाहणी करून त्यादृष्टीने महापालिकेस शिफारशी करण्यात आल्या. त्यानुसार, महापालिकेने तेथे आवश्‍यक बदल केले.

देशात रस्ते अपघात हा गंभीर प्रश्‍न बनला आहे. त्याचा फटका सामाजिक, आथिॅक व भावनिकदृष्ट्या फटका बसतो. ‘स्कोडा’ने हे चित्र बदलून रस्ते अधिक सुरक्षित करण्यास प्राधान्य दिले आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या मदतीने हे काम सुरू आहे.
- पियुष अरोरा, व्यवस्थापकीय संचालक, स्कोडा

खराडी बाह्यवळण चौकातून दररोज किमान २२ हजार पादचारी व किमान २ लाख वाहने जातात. पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे येथील अपघात थांबवून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी हा प्रयोग राबविला आहे.''
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

...असे आहे टॅक्‍टिकल अर्बनिझम!
अपघात व त्यामुळे होणारे मृत्यू, जखमी होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवर प्रयोग करण्यात येतात. त्यानुसार, रस्त्यांमध्ये आवश्‍यक बदल करणे, वाहतूक चॅनलीकरण, वाहनांचा वेग कमी करणे, पादचारी, सायकलस्वार यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावे, यासाठी आवश्‍यक बॅरीकेड, रस्त्यांवर पट्ट्या आखणे या स्वरूपाचे काम केले जाते.

उपाययोजना
- सुरक्षित ठिकाणी बसथांबा
- सुरक्षित ऑटो रिक्षा थांबा
- चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांचे उत्तम व्यवस्थापन
- चढ-उतार, वळणमार्ग याबाबत आवश्‍यक चिन्हांचा वापर
- पादचारी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्ग, रचना