PMP Bus
PMP Bus Tendernama
पुणे

पुणेकरांना आता तरी पीएमपीची चांगली सेवा मिळणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : PMPच्या ताफ्यात नव्या ९० E-Bus दाखल होणार असून, लवकरच त्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या एका ई-बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. येवढ्या महागड्या ई-बस मिळूनही पुणेकरांना चांगली सेवा पीएमपीकडून मिळणार का, हा प्रश्न अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे.

PMPचा पुणे स्टेशन डेपो हा पूर्णतः ई-डेपो (E Depot) होत आहे. या डेपोत ९० ई-बस (E-Bus) असून, त्यांचे उद्‍घाटन २० किंवा २२ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. हा ‘पीएमपी’चा पाचवा ई-बस डेपो असेल. तारीख निश्चित झाली नसली, तरी पुणे स्टेशन डेपोमध्ये कामांना वेग आला आहे. या नव्या ९० बसमुळे सुमारे ९० हजार प्रवाशांची सोय होणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘फेम-२’ या योजनेतून ‘पीएमपी’ला १५० बस मिळणार आहेत. यापैकी ४० बस डिसेंबरमध्ये ‘पीएमपी’ला मिळाल्या होत्या. एक कोटी ९५ लाखांची एक बस आहे. या ९० बसची ‘आरटीओ’कडे नोंदणी झाली आहे. मागच्या काही दिवसात बस चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा डेपोला मिळत नव्हता. त्यामुळे काही दिवस बसच्या लोकार्पणाचे काम थांबले होते. मात्र, आता ती अडचण दूर झाली आहे. ई-डेपोला पाच हजार ७०० किलो वॉट विजेची गरज होती, ती आता पूर्ण होत आहे. त्यामुळे बसचे उद्‍घाटन आता लवकर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

३७ चार्जर बसविण्याचे काम वेगाने
पुणे स्टेशन डेपोत सुमारे ३७ चार्जर बसविले जात आहे. एका चार्जरला दोन बस चार्जिंग करता येणार आहेत. बसच्या संख्येत वाढ झाली, तर चार्जरच्या संख्येतही वाढ होणार आहे. सध्या डेपोत याच कामाची गडबड सुरू आहे.

९० हजार प्रवाशांची सोय
ओलेक्ट्रा कंपनीची ही बस असून, त्याची आसन क्षमता ३३ प्रवाशांची आहे; तर वीस ते बावीस प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. या बसमधून एक दिवसांत सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ९० बसच्या माध्यमातून किमान दररोज प्रवास करणाऱ्या ९० हजार प्रवाशांची सोय होणार आहे.

सद्यःस्थिती काय?
पीएमपीचे एकूण डेपो : १५
इलेक्ट्रिक बस डेपो : ५
डेपो कुठे : भेकराईनगर, भक्ती-शक्ती, बाणेर, वाघोली व आता पुणे स्टेशन आदी डेपोंचा समावेश आहे.
‘पीएमपी’च्या एकूण बस : १६५०
सध्या धावत असलेल्या ई-बस : ३०५

पुणे स्टेशन हा ‘पीएमपी’चा पाचवा ई-बस डेपो आहे. २२ ऑगस्टला या डेपोचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे. आता वीजपुरवठ्याचा प्रश्नदेखील सुटला आहे. त्यामुळे आता कामाला गती आली आहे.
- डॉ. चेतना केरुरे, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे