PMC Tendernama
पुणे

मूलभूत सुविधांसाठी आमदारावरच उपोषण करण्याची वेळ का आली?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वडगाव शेरी (Wadgaon Sheri) मतदारसंघातील रस्ते, पाणी, उड्डाणपूल, वाहतूक कोंडी अशा विविध समस्यांबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी गुरुवारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करीत महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. महापालिका प्रशासनानेही टिंगरे यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेत येत्या १५ दिवसांत सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी लेखी आश्‍वासन दिले, त्यानंतर टिंगरे यांनी आंदोलन मागे घेतले.

टिंगरे यांनी गुरुवारी दुपारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासमवेत वडगाव शेरी, लोहगाव, विश्रांतवाडी येथील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. पोरवाल रस्ता, नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी, एअरफोर्सच्या जागेतील (५०९) ते धानोरी रस्ता, नदीकाठचा रस्ता प्रलंबित आहे.

वाहतुकीस अडथळा ठरणारे विश्रांतवाडी येथील धार्मिक स्थळ स्थलांतरित करणे, लोहगाव येथील पाणीप्रश्‍न, खंडोबामाळ व डीपी रस्ता, सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनर्वसन, धानोरी लक्ष्मी टाऊनशिप ते लक्ष्मी स्मशानभूमी रस्ता, धानोरी सर्व्हे क्रमांक पाच ते १२ रस्ता, धानोरी पेलेडीयम रस्ता ते सर्व्हे क्रमांक सहा रस्ता या प्रलंबित प्रश्‍नांकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टिंगरे यांनी केला.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘‘आमदार टिंगरे यांची भेट घेऊन आगामी १५ दिवसांत संबंधित प्रश्‍न सोडविण्याबाबत आश्‍वासन दिले.’’

आरोप-प्रत्यारोप

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘वडगाव शेरी मतदारसंघातील विविध कामे भाजपच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहेत. मेट्रोचे काम ६० टक्के पूर्ण आहे, भामा-आसखेडमुळे पाणीप्रश्न सुटला आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे ७० टक्के काम झाले आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठीही उड्डाणपुलाची कामे झाली आहेत. असे असताना टिंगरे यांना कामे करता आली नाही, त्याद्वारे टिंगरे यांची निष्क्रियता व अकार्यक्षमता लोकांपुढे आली आहे. उपोषणाची वेळ आली म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला आहे.’’

यावर टिंगरे म्हणाले, ‘‘वडगाव शेरी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्‍नांवर मी विधिमंडळ अधिवेशनातही राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. तरीही महापालिका लक्ष देत नाही. जगदीश मुळीक यांचा लोकांनीच २०१९ मध्ये भोपळा फोडला आहे. निष्क्रीय कोण आहे, हे लोकांनी दाखवून दिले आहे