Mumbai-Pune Express way
Mumbai-Pune Express way Tendernama
पुणे

Pune-Mumbai Expressway वर का कोसळल्या दरडी? 'हे' आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune - Mumbai Expressway) गेल्या काही दिवसांत तीन वेळा दरडी कोसळल्या. तेथील पावसाचे प्रमाण हे सरासरी पर्जन्यमानाइतके आहे. मात्र, यंदा दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. मिसिंग लिंक (Missing Link) व रस्त्याच्या अन्य कामांसाठी वारंवार ‘ब्लास्ट’ (Blast) केले. त्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

द्रुतगती मार्गावर आडोशी बोगदा, कुसगाव व कामशेत येथे दरड कोसळली. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला. महामार्ग पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) दुपारी १२ ते दोन या वेळेत ब्लॉक घेऊन दरड हटविण्याचे काम केले. मात्र, त्याच रात्री कामशेत येथे दरड कोसळली. त्याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला.

शुक्रवारी पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरून वळविण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून ‘मिसिंग लिंक’चे काम सुरू आहे. हा बोगदा आठ किलोमीटरचा असून, त्याची रुंदी २३.७५ मीटर इतकी आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बेसॉल्ट खडक फोडण्यात आला. शिवाय, यंदाच्या उन्हाळ्यातही रस्त्यांची कामे काही प्रमाणात करण्यात आली. त्यासाठीही ‘ब्लास्ट’ करण्यात आले. त्याचा हा परिणाम असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येथे कोसळली दरड

कुसगाव-खोपोलीदरम्यान मिसिंग लिंकचे काम सुरू आहे. त्याच्या जवळच्या भागातच गेल्या सहा दिवसांत दरड कोसळली. एक दरड कुसगाव येथे, तर दुसरी दरड आडोशी व कामशेत येथे कोसळली. या भागातही रस्त्याच्या कामांसाठी छोट्या प्रमाणात ब्लास्ट केले आहेत.

‘ब्लास्ट’चा परिणाम

२००५ मध्ये कोकण रेल्वेच्या मार्गासाठी बोगदा खणण्याचे काम सुरू होते. महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत हा बोगदा तयार केला जात होता. बोगद्यापासून दासगावचे अंतर दूर होते. मात्र, ब्लास्ट केल्यामुळे दासगावमध्ये दरडी कोसळल्या होत्या.

ब्लास्टिंगमुळे हादरे बसतात. हा एक प्रकारचा कृत्रिम भूकंपच आहे. हादऱ्यामुळे खडकांना भेगा पडतात. नंतर त्या रुंदावतात. त्यात पावसाचे पाणी गेल्यानंतर खडकाचा स्तर ढासळू लागतो. त्याचा परिणाम म्हणून दरडी कोसळतात.

- सतीश ठिगळे, भूगर्भशास्त्रज्ञ, पुणे