Pune
Pune Tendernama
पुणे

एकाच पावसात पुण्यातील रस्ते पाण्याखाली का जाताहेत?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने महापालिका प्रशासनाचे पुन्हा एकदा पितळ उघड पडले. नाल्यांना आलेला पूर, रस्त्यांना आलेले नदीचे स्वरूप, चौकांचे झालेले तळे, त्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले.

नालेसफाई, पावसाळी गटारांची सफाईसाठी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केला. पण हा सगळा खर्च पाण्यातच गेल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या सर्व प्रकारावर महापालिका प्रशासनाने दरवेळेस प्रमाणे ‘कमी कालावधीत जास्त पाऊस झाला म्हणून ही स्थिती ओढवली असा खुलासा करत घडलेल्या प्रकाराकडे डोळेझाक केली. कोथरूड, पाषाण, बावधन, कात्रज, धायरी, कोंढवा, हडपसर, फुरसुंगी, येरवडा, चंदननगर, वडगाव शेरी या उपनगरांसह मध्यवर्ती पेठांच्या भागात रविवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस झाला.

पावसाला सुरवात होताच अवघ्या काही वेळातच नाल्यांना पूर आला, रस्त्यावरून वेगाने पाणी वाहू लागले. पाण्याच्या प्रवाहामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्‍वार खाली पडले. खड्ड्यांमुळे पाण्यातून गाडी चालवताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. पण जसा पाऊस वाढत गेला तसे गल्लीबोळातून वेगात मुख्य रस्त्यावर पाणी येऊ लागेल. चौकांमध्ये गुडघ्यावर पाणी जमा झाल्याने अनेकांची वाहने बंद पडली. वाहतूक ठप्प झाली. रत्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला. अशा प्रकारे शहरातील स्थिती वाईट झालेली असताना महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मात्र गायब होती.

चौकांसह रस्त्यांवर पाणी साचले, पण त्याचा निचरा करून देणारी यंत्रणा ठप्प झाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी भर पावसात काही पोलिसांनी चेंबरमधील कचरा काढला; पण महापालिकेचे कर्मचारी शहरात दिसले नाहीत. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तेथे अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षीत बाहेर काढले. रविवारी रात्री साडेआठनंतर शहरातील पाऊस थांबल्यानंतर हळू-हळू रस्त्यावरील पाण्याचा निचरा होऊ लागला व वाहतूक सुरळीत झाली.

प्रवेशद्वार पाण्याखाली

महापालिकेकडून दरवर्षी धोकादायक ठिकाणांवर लक्ष ठेवले जाते, असे सांगितले जाते. पण, यंदाच्या पावसाळ्यात नवीन धोकादायक ठिकाणे निर्माण झाली. त्यामध्ये महामार्गावरून पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणी प्रचंड पाणी साचले होते. कोथरूड कचरा डेपो, पौड रस्ता, सातारा रस्त्यावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय, तसेच स्वामी विवेकानंद चौक, धानोरी-लोहगाव रस्ता, विमाननगर चौक, सिंहगड रस्त्यावर वडगाव पुलाखालील रस्त्यावरून वेगात पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

डोंगरावरचे पाणी महामार्गावर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाणी थेट महामार्गावर आले. मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचले. बावधन व आंबेगाव येथे सेवा रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहून भुयारी मार्गात जमा झाल्याने या भागातील वाहतूक विस्कळित झाली. डोंगरावरील पाणी महामार्गावर येऊ नये, यासाठी उपाययोजना केले नसल्याचे दिसून आले.

धानोरी, येरवड्याला दुसऱ्यावर्षी तडाखा

गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात नगर रस्ता परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्याचा फटका धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी यांसह इतर भागाला बसला होता. त्यानंतर या भागातील नाले बुजविणे, चुकीच्या पद्धतीने वळविणे यावर मोठी चर्चा झाली. प्रशासनाने कारवाईचे आश्‍वासन दिले होते. मात्र, वर्षभरानंतर तीच स्थिती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.