Water Tunnel
Water Tunnel Tendernama
पुणे

28 KM लांबीचा 'हा' बोगदा का ठरणार पाणी कपातीवरल रामबाण उपाय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे ९Pune) : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाणी कपातीसारख्या उपाययोजनांवर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला पूर्णविराम देऊ शकणाऱ्या आणि आहे त्या पाणी साठ्यात बचत करणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यानच्या प्रस्तावित २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या (भूमिगत कालवा) अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने हिरवा कंदील दाखविला आहे.

मार्च ते मे या तीन महिन्यांत कालवा आणि धरणातील पाण्याचे बाष्पीभवन, उन्हाळी आवर्तन आणि गळतीमुळे जवळपास २.८ अब्ज घनफूट पाणी वाया जाते. म्हणजे सहा कोटी १७ लाख ३० हजार ७२५ लिटर पाणी वाया जाते. खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेल्यास त्यामध्ये बचत होऊ शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरी या पाण्याच्या मदतीने जुलैअखेरपर्यंत पाणी टंचाईचा सामना करता येऊ शकतो, असे या प्रकल्पाच्या अहवालावरून समोर आले आहे.

दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार
या प्रकल्पातंर्गत खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान २८ किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या अहवालासाठी टेंडर काढून काम दिले होते. संबंधित कंपनीने याबाबतचा अहवाल जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविला होता. त्या अहवालात या समितीने किरकोळ त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरुस्त केल्यानंतर समितीने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे हा अहवाल अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविणार आहे.

या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २.८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीलाही पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

असा असणार बोगदा
- ७.८० मीटर रुंद
- ३.९० मीटर उंच
- १.९५० मीटर गोलाकार उंची
- ‘डी’ आकाराचा बोगदा
- कालव्याची क्षमता १५१० क्युसेक्स होणार
- गुरूत्वाकर्षणाने सर्व पाणी फुरसुंगीपर्यंत नेणार
- पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होणार
- अडीच टीएमसी पाणी वाचणार

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावास तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी तो प्रस्ताव जाणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.
- ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग