PM Narendra Modi
PM Narendra Modi Tendernama
पुणे

PM मोदींचे 'ते' स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारा भारतीय कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सत्तर-ऐंशीच्या दशकाचा काळ, परदेशातील रेल्वे पाहिल्यावर भारतात कधी अशी रेल्वे (Railway) धावणार असा प्रश्न पडायचा. भारतात इंजिन, रेल्वे हे सर्व परदेशातून येत होते. आपण कधी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून भारतात आधुनिक व वेगवान रेल्वेची निर्मिती करणार, असा विचार मनात यायचा.

भारताने स्वतःची वेगवान रेल्वेची निर्मिती करावी हे स्वप्न पाहिलं. त्यासाठी तब्बल १८ महिने, १२ हजारांहून अधिक कामगार मेहनत करीत राहिले अन् डिसेंबर २०१८ मध्ये देशाची पहिली सेमी हाय स्पीड रेल्वेची निर्मिती झाली. हा प्रवास उलगडला वंदे भारत एक्स्प्रेसचे जनक सुधांशू मणी यांनी.
महेश इंडस्ट्रिअल ग्रुपच्या वतीने रविवारी कलमाडी हायस्कूल येथे सुधांशू मणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, महेश इंडस्ट्रिअल ग्रुपचे अध्यक्ष मनोज बेहेडे यांची उपस्थिती होती.

सुधांशू मणी म्हणाले, ‘‘मी रेल्वेच्या विविध पदावर काम केले. ज्यावेळी सरव्यवस्थापक होणार होतो, तेव्हा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांना भेटून चेन्नई येथील ‘आयसीएफ’च्या कोच फॅक्टरीचे सरव्यवस्थापक पदावर नियुक्ती करण्याची मागणी केली. जेणेकरून मी पाहिलेले वेगवान रेल्वेच्या निर्मितीचे स्वप्न साकार करता येईल. नियुक्ती झाल्यावर मात्र ध्येय ठरवून कामाला लागलो. मात्र, अशा प्रकारची रेल्वे तयार करण्यात खूप अडचणी आल्या.

त्याच वेळी परदेशातून रेल्वे आणण्याची तयारी सुरू झाली होती. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष यांना भेटून तुम्हाला परदेशी बनावटीची रेल्वे घ्यायची असेल तर घ्या, पण मला तशी रेल्वे भारतात निर्माण करण्याची एक तरी संधी द्या असे सांगितले.

अखेर संधी मिळाली. अन दिवस-रात्र एक करून कर्मचाऱ्यांनी अवघ्या १८ महिन्यांत ट्रेन अठराची निर्मिती केली. त्यालाच नंतर वंदे भारत एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले. आज या रेल्वेने भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे.’’

कर्मचाऱ्यांच्या मनात जागा...
१९५५ चेन्नई येथे आयसीएफ कारखाना सुरू झाला. आतापर्यंत त्याचे सरव्यवस्थापक मोजक्याच कार्यक्रमासाठी तेथे येत. मी मात्र तेथे नेहमी जात राहिलो. तेथे उद्‍घाटनाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या १७० पाट्या काढून टाकण्याचे आदेश दिले. उलट तिथल्या एका भिंतीवर फॅमिली ट्री काढून सुमारे १२ हजार कर्मचाऱ्याचे छोटे फोटो तिथे लावण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांच्या सोबतच्या असंख्य बैठका कारखान्यात जाऊन, त्यांच्या ठिकाणी जाऊन, प्रसंगी उभे राहून घेत होतो. परिणामी त्याचा चांगला परिणाम कर्मचाऱ्यावर झाला. सर्व कर्मचारी मेहनतीने काम करून ताशी १८० किमी वेगाने धावणारी रेल्वे अवघ्या १८ महिन्यांत निर्माण झाली असल्याचे मणी यांनी सांगितले.