Potholes (File)
Potholes (File) Tendernama
पुणे

दोषी ठेकेदारांवर कारवाई कधी होणार? पाठिशी घालणारे ते अधिकारी कोण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील गल्लीबोळातील रस्त्यांची दुरवस्था कायम असताना निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासन कुचराई करत आहे. क्षेत्रीय कार्यालयांना वारंवार पत्र पाठवून त्यांची माहिती संकलित होऊन एक आठवडा उलटून गेला. दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड - DLP) दोन हजार ९९ रस्त्यांची माहिती १५ क्षेत्रीय कार्यालयांनी सादर केली. पण, कारवाईचे नियोजन झाले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे काम करूनही अभय मिळत आहे.

शहरातील १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते तयार करणे व त्यांची देखभाल-दुरुस्ती ही मुख्य पथ विभागाकडे येते, तर १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे काम क्षेत्रीय कार्यालयांकडून केले जाते. शहरात एकूण १४०० किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी ९७० किलोमीटरचे रस्ते हे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे असून, या रस्त्यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. रस्त्याचा डीएलपी कालावधी तीन वर्षाचा असतो, पण काम केल्यानंतर तीन ते चार महिन्यातच रस्त्यांवर खड्डे पडले. मुख्य खात्याकडील रस्त्यांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला. त्यानुसार सहा ठेकेदारांवर सुमारे पाच लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. पण, क्षेत्रीय कार्यालयांकडे रस्त्यांची संख्या जास्त असतानाही त्यांनी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष झाले.

क्षेत्रीय कार्यालयांकडील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश जुलै महिन्यात दिले होते. पण काही क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर माहिती सादर करण्यात आली.
क्षेत्रीय कार्यालयांकडील ९७० पैकी २०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून उर्वरित ८७० किलोमीटरचे रस्ते डांबरी आहेत. त्यापैकी सुमारे २०० किलोमीटरचे दोन हजार ९९ रस्ते ‘डीएलपी’मध्ये असल्याचे क्षेत्रीय कार्यालयांकडून आलेल्या माहितीतून समोर आले आहे. या रस्त्यांची तपासणी करून कारवाई करणे अनिवार्य आहे. पण, नेमकी तपासणी आणि कारवाई कशी करायची यावरून स्पष्टता नाही.

क्षेत्रीय कार्यालयांकडून डीएलपीतील रस्त्यांची माहिती मिळाली आहे. सर्वच रस्ते तपासणे शक्य नाही, त्यामुळे किमान १० टक्के रस्त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाईल. त्यासाठी आयुक्तांकडे निवेदन देवून कारवाई केली जाईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग

बोपोडी भागात भाऊ पाटील रस्त्यावर खड्डे पडले आहेत, पण हे खड्डे अजून बुजविले नाहीत. हा रस्ता विसर्जन घाटाकडे जातो, तरीही महापालिकेला खड्डे बुजवावे वाटले नाहीत. रस्त्यावरील माती न काढल्याने चिखल झाला आहे. याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहेत.
- ॲड. विजय शेलार, नागरिक

क्षेत्रीय कार्यालय......................डीएलपीतील रस्त्यांची संख्या
नगर रस्ता-वडगाव शेरी - ४०३
येरवडा- कळस - १३
ढोले पाटील - ६०
औंध-बाणेर - ९३
शिवाजीनगर-घोले रस्ता - ११
कोथरूड-बावधन - ८१
धनकवडी-सहकारनगर - २७४
सिंहगड रस्ता - ६५१
वारजे कर्वेनगर - १५०
हडपसर-मुंढवा - ५८
वानवडी-रामटेकडी - ६८
कोंढवा येवलेवाडी - ११०
कसबा विश्रामबाग - ५१
भवानी पेठ - २४
बिबवेवाडी - ५२