Vande Bharat Tendernama
पुणे

चाकाला आग, धोक्याचा संदेश... 'वंदे भारत' एक्स्प्रेसला बोरघाटात नेमके काय झाले?

Vande Bharat Accident: त्या ‘वंदे भारत’चा प्रवास थांबविला; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाकाला बोरघाटात शुक्रवारी थोडी आग लागल्याची घटना घडली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्थानकाकडे धाव

सेन्सरमुळे (हॉट ॲक्सल बॉक्स डिटेक्टर) धोक्याचा संदेश मिळाला. चालकाने सतर्कतेने व वेग कमी करून रेल्वे पुणे स्थानकावर आणली. घटना गंभीर असल्याने पुणे स्थानकावर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘वंदे भारत’चा प्रवास थांबविला. त्याऐवजी ‘डेक्कन क्वीन’ सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सेन्सरमुळे ‘वंदे भारत’चा अपघात टळला. अशा प्रकारची ही मध्य रेल्वेतील पहिलीच घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेगाने धावत असताना शुक्रवारी बोरघाटात अचानक चाकाला आग लागली. हॉट ॲक्सल बॉक्स डिटेक्टरमधील (एचएबीडी) सेन्सरमुळे चाकाचे तापमान खूप वाढल्याचा संदेश चालकाला मिळाला. त्यांनी तातडीने पुण्याच्या रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यामुळे पुणे स्थानकावर यंत्रणा सतर्क झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकाकडे धाव घेतली.

‘वंदे भारत’चा वेग व त्याला असलेला दर्जा लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालकाला सूचना दिल्या. ‘वंदे भारत’ शुक्रवारी सायंकाळी सात वाजून १४ मिनिटांनी पुणे स्थानकावर फलाट दोनवर दाखल झाली. त्यावेळी नुकतीच आलेली ‘डेक्कन क्वीन’ यार्डमध्ये न सोडता रात्री नऊ वाजून २० मिनिटांनी सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ केली. ‘वंदे भारत’चे प्रवासी ‘डेक्कन क्वीन’मध्ये बसून सोलापूरला रात्री बाराच्या सुमारास पोचले.

‘एचएबीडी’ म्हणजे काय?
- इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असून चाकांमध्ये (अ‍ॅक्सल बॉक्स) जास्त उष्णता निर्माण झाल्यास अलर्ट करते.
- अ‍ॅक्सल बॉक्स चाकाशी जोडलेले महत्त्वाचे यांत्रिक भाग असतात.
- जर घर्षणामुळे किंवा ब्रेकडाऊनमुळे किंवा आगीमुळे जास्त उष्णता निर्माण झाल्यास ते अपघाताला कारणीभूत ठरते.
- अशा उष्णतेचा वेळीच शोध घेण्यासाठी ‘एचएबीडी सेन्सर’ बसवले असतात.

चाकाचे तापमान किमान १०० अंश सेल्सिअस :
- सामान्यपणे रेल्वेच्या चाकाचे तापमान ४० ते ६० अंश सेल्सिअस इतके असते.
- ८५ ते १०० अंश सेल्सिअस तापमान झाल्यावर ‘एचएबीडी’ यंत्रणा धोक्याचा इशारा देते.
- जर तापमान ८५ अंशांपेक्षा जास्त झाल्यास त्याला रेल्वेच्या भाषेत हॉट ॲक्सल असे म्हटले जाते.
- १०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान झाल्यास रेल्वे प्रशासन त्या रेल्वेचा प्रवास थांबविते.