PMC Tendernama
पुणे

उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, पनवेल जोमात; पुणे महापालिका मात्र कोमात! नेमकं काय झालं?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर गतिमान कारभार आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी पहिल्या १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या १०० दिवसांच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला, पण प्रत्यक्षात कामात सुधारणा झालीच नाही. या सुमार कामगिरीमुळे पहिल्या चार मध्ये पुणे शहराचा समावेश होऊ शकला नाही. (Ulhasnagar, PCMC, Panvel, Navi Mumbai, PMC News)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरात कामाला गती यावी, यासाठी शासकीय विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस आयुक्तालय यांच्यासाठी १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रम जाहीर केला होता. यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार बैठका घेऊन प्रत्येक विभागाला कशा पद्धतीने कामे करायची आहेत, याची सूचना दिली होती.

या कामांचे मूल्यांकन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले आहे. या निकालानुसार वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा १० मुद्यांवर गुण देण्यात आले. त्यात महापालिका गटात उल्हासनगर महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे, त्यानंतर पिंपरी - चिंचवड, पनवेल आणि नवी मुंबई या महापालिकांनी चांगले काम केले.

पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १०० दिवसांच्या सुधारणांसाठी बैठका घेतल्‍या. यात महापालिकेच्या कामकाजात इ - फाइल प्रणाली सक्षमपणे राबविणे, कामकाजात ‘एआय’चा वापर वाढविणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे, नागरिकांच्या सनदीनुसारच्या सेवा विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्‍यक होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले.

याच कालावधीत महापालिकेत कोट्यवधी रुपयांच्या टेंडरमध्ये गडबडी झाल्या. त्यांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करण्यात आले. इ - फाइलचा वापर वाढवा असे आदेश देऊनही अनेकांनी त्यास केराची टोपली दाखवली. ‘एआय’ प्रशिक्षण घेण्यात आले. पण त्याचा प्रत्यक्षात नागरिकांसाठी वापर झाला नाही. तसेच कार्यालयांची स्वच्छता, इमारतींची रंगरंगोटी, यावर भर देण्यात आला. पण त्यामुळे महापालिकेला जास्त गुण मिळाले नाहीत.