Chandani Chwok
Chandani Chwok Tendernama
पुणे

Pune: चांदणी चौकात पुन्हा कोंडी; पुन्हा वाहनांच्या रांगा...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandni Chowk) जुना पूल पाडल्यानंतर सारे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा येथून दररोज प्रवास करणारे नागरिक, वाहनचालकांना आहे. मात्र, पूल पाडल्यानंतर पाच - सहा दिवस झाले असले तरी दररोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. चांदणी चौकातील कामामुळे गुरुवारी सायंकाळीही बावधन (Bavdhan) बाजुला महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ऐन रहदारी असताना सायंकाळी काम बंद ठेवावे व एक लेन वाहनांसाठी उपलब्ध करून द्यावी, याबाबत पोलिसांनी (Traffic Police) संबंधित विभागाला सूचना देऊनही काम सुरूच राहील्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याची सद्यस्थिती आहे.

चांदणी चौकातील एनडीए-बावधनला जोडणारा जुना पूल पाडून पाच-सहा दिवस उलटून गेल्यानंतरही चांदणी चौकातील वाहतूक सुरळीत झालेली नाही. चौकातील पूल पाडण्याचे काम झालेले असले तरीही, पुलाभोवतीचा खडक फोडण्याचे काम अद्यापही सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदार कंपनीकडून वेळोवेळी खडकावर स्फोट घडवून, तो राडारोडा तत्काळ उचलण्यावर भर दिला जात आहे. मात्र त्यामुळे काही वेळ वाहतूक थांबविण्यात येत असल्यामुळे त्याचा ताण वाहतुकीवर पडत असल्याचे चित्र सोमवारीही दिसून आले होते.

दररोज सायंकाळी मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे या वाहनांना कोंडीचा फटका बसू नये, यासाठी रहदारीच्यावेळी, सायंकाळी काम थांबविण्याच्या तसेच साताऱ्याला जाणाऱ्या बाजुची एक लेन वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. मात्र अजूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी देखील, बावधनपासून चांदणी चौकापर्यंतच्या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.

एसटी बस, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस अशी वाहने महामर्गावर थांबूनच प्रवासी भरत असल्याने पाठीमागे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असल्याची सद्यस्थिती आहे. विशेषतः अनेकदा प्रवासी बसथांब्याजवळ थांबण्याऐवजी थेट महामार्गावर येत असल्याने वाहतूक कोंडीबरोबरच प्रवाशांसाठी हा प्रकार जीवघेणा ठरतो आहे.

चांदणी चौकातील पूल पाडून 5 - 6 दिवस झाले तरी अजूनही दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. वाहतूक कोंडीत अडकून किती वेळ घालवायचा, याचा विचार करून प्रशासनाने पर्यायी मार्गाचा विचार आता तरी केला पाहिजे.

- वैष्णवी केदारी, नोकरदार