speed
speed Tendernama
पुणे

Mumbai Pune Expressway वरून प्रवास करताय, मग ही बातमी वाचा!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरचा (Mumbai Pune Expressway) प्रवास थोडा वेगवान होणार आहे. कारण प्रशासनाने या मार्गावरील घाट सेक्शनमध्ये असलेल्या वाहनांची वेग मर्यादा वाढवली आहे. मोटारीला पूर्वी वेग मर्यादा तशी ५० होती, ती आता ६० केली आहे. त्यामुळे घाटात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक गतीने पूर्ण होणार आहे. Mumbai Pune Expressway Speed Increased)

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी या संख्येत वाढ होऊन ती संख्या ९० हजारांच्या घरात पोहचते. दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या, अपघाताचे वाढते प्रमाण व निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरच्या प्रवासाला ब्रेक लागत आहे.

या अडचणी लक्षात घेता महामार्ग पोलिसांनी घाटात वेगाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झालेली आहे. समतल भागात मात्र वेगाच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही.

समतल भागात ताशी १०० किलोमीटर व घाटात ताशी ६० किलोमीटरची वेग मर्यादा मोटारीला आखून दिलेला आहे. जड वाहनांच्या बाबतीत कोणताही बदल केलेला नाही.

वेग वाढल्याचा फायदा काय?
- पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना घाटात तीव्र उतार आहे. समतल भागात ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या वाहनांचा वेग थेट ताशी ५० किलोमीटर आणणे चालकांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत होते. वेग कमी करताना अनेक वाहनांचे अपघातदेखील झाले आहेत. असे अपघात टाळणे शक्य होईल.
- वेग वाढविल्याने आता मोटारी घाटात रेंगाळणार नाहीत, परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- पूर्वीच्या तुलनेत प्रवास काहीसा वेगवान होईल.
- लवकरच ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही प्रणाली सुरू झाली तर वेग वाढल्याने संबंधित वाहनांवर कारवाई झाली असती. मात्र, प्रशासनाने स्वतःहूनच वेगाची मर्यादा वाढविल्याने ताशी ६० किमी धावणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार नाही.

मोटारींचे घाटात होणारे अपघात कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. केवळ मोटारीची वेग मर्यादा वाढवली आहे, जड वाहनांची नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
- सुखविंदरसिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक), मुंबई