पुणे (Pune) : स्मार्ट सिटीसाठी व्याकुळलेले कोथरूडकर सध्या नित्याच्या वाहतूक कोंडीने ग्रासले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची धमक असणारे नेतृत्व आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी व पुरेसे कर्मचारी असतील तरच यावर मार्ग निघू शकेल, असे येथील नागरिकांना वाटत आहे.
कर्वे रस्ता व पौड रस्त्यावर मेट्रोस्थानकावर वाहनतळ नसल्याने पदपथ, सायकलमार्गावर दुचाकींचे पार्किंग केले जाते. आता मेट्रोखाली ‘नो पार्किंग’ धोरण राबविण्याच्या अशा सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. देवाशीष फाउंडेशनच्या कांचन कुंबरे म्हणाल्या की, वाहनतळाबाबत धोरण ठरवणे गरजेचे आहे. रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीला जागा अपुरी पडत आहे. कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे रस्त्यावर धावणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. पुढील दोन वर्षांत जेव्हा या परिसरात २७ मजली इमारती उभ्या राहतील, तेव्हा आपल्याकडे वाहतुकीसाठी पुरेसे रस्ते उपलब्ध नसतील ही वस्तुस्थिती आहे. त्याची व्यवस्था आतापासूनच करावी लागेल.
लक्ष्मीनगर येथील रहिवासी साधना डाकले म्हणाल्या की, नवभुमी चौकात अण्णासाहेब पाटील शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मेट्रोच्या वाहिनीसाठी खोदलेला खड्डा गेल्या दोन महिन्यापासून तसाच आहे. हे काम कधी संपणार व खड्डा कधी बुजविणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांबरोबरच येथे असलेल्या बसथांब्यालाही अडथळा निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून कामाचे नियोजन, नियंत्रण व व्यवस्थापन केले जात नाही.
गेल्या तीन महिन्यापासून पौड रस्त्यावर ठिकठिकाणी खोदाई सुरू आहे. तसेच कोथरूड स्मशानभूमीत वाहनतळासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने विधीसाठी आलेल्या लोकांच्या वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागतात. त्यामुळे कारणांमुळे या रस्त्यावर कोंडीची समस्या उद्भवते होते.
- राम बोरकर, रहिवासी, भुसारी कॉलनी
मेट्रोखाली होणाऱ्या पार्किंगबाबत पर्यायी व्यवस्थेची मागणी महापालिकेकडे केली आहे. वाहतूक नियंत्रक दिवे असलेल्या चौकात जलवाहिनीचे काम शक्यतो रात्री करावे असा आग्रह धरला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी आणखी मनुष्यबळ मिळणार असल्याने वाहतुकीची गती मंदावणार नाही, यादृष्टीने पुरेपुर उपाययोजना करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- चांगदेव सजगणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक, वाहतूक शाखा
‘चारचाकी’चे अनधिकृत वाहनतळ
भेलकेनगर ते एकलव्य कॉलेज रस्ता, संगीतकार ठाकरे पथ, संपूर्ण पौड रस्ता, एमआयटी रस्ता, कोथरूड पोलिस ठाणे ते आशिष गार्डन चौक, शिक्षकनगर ते पेठकर साम्राज्य हे रस्ते चारचाकी वाहनांचे अनधिकृत वाहनतळ झाले असून या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.
हे आहेत उपाय
- १५ मिसिंग लिंक जोडण्याची गरज
- खोदकाम, पथारीवाले, वाहनतळ याबाबतच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी करणे
- एसएनडीटी चौक येथील टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण केल्यास येथे बॉटल नेक होणार नाही
- व्यावसायिक इमारतींपुढे करण्यात येणारे वाहनांचे पार्किंग बंद करणे