Katraj-Kondhwa Road Tendernama
पुणे

'तो' पर्यंत कात्रज-कोंढवा रस्त्याचे डांबरीकरण नाही

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेने कात्रज कोंढवा रस्त्याचे डांबरीकरण, खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, त्याचवेळी या रस्त्यावर समान पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी, मोबाईल कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सुरू झाल्याने पुन्हा एकदा पथ विभाग आणि इतर विभागातील समन्वयाचा अभाव समोर आला आहे. हे खोदकाम पूर्ण होईपर्यंत डांबरीकरण न करण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.

गेल्या चार वर्षापासून कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या रस्त्यावर अवजड वाहतूक असल्याने अनेकदा अपघात झाले. या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने रस्ता चांगला करण्यासाठी महापालिकेने पावसाळा संपण्यापूर्वीच टेंडर मंजूर करून घेतले. आता दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू केले जाणार होते, पण त्याचवेळी समान पाणी योजना, विद्युत विभाग, मलःनिसारण विभाग, गॅस वाहिनी, मोबाईल केबल टाकण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे डांबरीकरण केल्यास पुन्हा खड्डे पडणार आहेत. त्यामुळे डांबरीकरणाचे काम थांबविण्याची वेळ आली आहे.

कात्रज कोंढवा रस्त्याचे काम यापूर्वीच केले जाणार होते, पण पावसाळ्यामुळे काम केले नाही. आता हे काम सुरू झाले, पण त्याचवेळी पाणी पुरवठा, विद्युत आदी विभागांची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे नवीन रस्ता पुन्हा खोदला जाण्याची शक्यता असल्याने जो पर्यंत खोदकाम होत नाही तो पर्यंत काम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी कुलकर्णी यांनी सांगितले.