Pune
Pune Tendernama
पुणे

पुण्यातील खड्ड्यांप्रकरणी फक्त तीनच ठेकेदारांनी भरला दंड; यादी आहे

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आत्तापर्यंत फक्त तीनच ठेकेदारांनी महापालिकेकडे ३ लाख ७२ हजार रुपयांचा दंड भरला आहे. दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी) रस्त्यांवर खड्डे पडूनही अद्याप कारवाईला वेग आलेला नाही. दरम्यान, १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी ९ क्षेत्रीय कार्यालयांनी महापालिकेकडे डीएलपीमधील ६४० रस्त्यांची यादी सादर केली आहे.

पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. डीएलपी कालावधी तीन वर्षांचा असतानाही त्याआधीच रस्त्यांना खड्डे पडले, खडी निघून गेली. काही रस्ते अवघ्या चार पाच महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या मुख्य पथ विभागाकडे १३९ रस्ते डीएलपीमधील आहेत, त्यांची तपासणी करून अहवाल सादर केला. प्रशासनाने एका खड्ड्यासाठी (एक चौरस मीटर) खर्चाच्या तिप्पट म्हणजे ५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक रस्त्यांना खड्डे पडून देखील आत्तापर्यंत केवळ पाच रस्त्यांवर कारवाई केली, त्यापैकीही तीन ठेकेदारांनी त्यांना केलेल्या दंडाची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा केली आहे.

या कार्यालयांनी दिली माहिती...
क्षेत्रीय कार्यालयांकडे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची जबाबदारी आहे. गल्लीबोळातील रस्त्यांनाही मोठ्याप्रमाणात खड्डे पडून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे रस्ते निकृष्ट दर्जाचे केल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी क्षेत्रीय कार्यालयांनी डीएपलपीमधील रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. सोमवारी सहा क्षेत्रीय कार्यालयांनी मुख्य पथ विभागाकडे ही माहिती सादर केली. त्यामध्ये औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील ९३ रस्ते, शिवाजी नगर घोले रस्ता कार्यालय ११, कोथरूड बावधन कार्यालय ८१, वारजे कर्वेनगर १५०, हडपसर मुंढवा ५८, वानवडी रामटेकडी कार्यालय ६८, कोंढवा येवलेवाडी कार्यालय ११०, कसबा विश्रामबाग ५१, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने १८ असे एकूण ६४० रस्त्यांची माहिती सादर केली आहे.

कात्रज येतील नॅन्सी लेक होम्स लेक टाऊन पद्मजा पार्क या रस्त्याला खड्डे पडल्याने मे एस. एस. कन्स्ट्रक्शनने १ लाख ३२ हजार ९९० रुपयांचा दंड भरला. देसाई हॉस्पिटल मुख्य रस्ता येथे खड्डे पडल्याने गणेश एंटरप्राइजेस कंपनीने २ लाख ३० हजार रुपयांचा दंड भरला. तर धायरी येथील श्री कंट्रोल चौक ते काळुबाई मंदिर रस्ता हे काम करणाऱ्या दीपक कन्स्ट्रक्शनने १० हजार रुपये दंड भरला आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभा, पुणे महापालिका