Railway Station
Railway Station Tendernama
पुणे

पुणे रेल्वेस्थानकाचे 'हे' फलाट महिनाभर बंद; अनेक गाड्यांना फटका

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) डिसेंबर महिन्यापासून बहुप्रतिक्षेत व बहुचर्चित यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होत आहे. मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डाचे काम पहिल्यांदा हाती घेण्यात येईल. येथे लोकलसाठी असलेला ट्रीप शेड पाडण्यात येईल. यानंतरच फलाट सहाच्या विस्तारीकरणाच्या कामास सुरुवात होईल. त्यामुळे फलाट सहा किमान एक महिना वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. यार्ड रिमॉडेलिंगचे काम अत्यंत वेळखाऊ व किचकट आहे. पुणे स्थानकावरच हे काम सुमारे चाळीस आठवडे चालणार आहे. मात्र ते टप्याटप्याने केले जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारा डीसीएन (विभागीय परिपत्रक नोटिस) देखील तयार करण्यात आला आहे. अंतिम मंजुरी मिळताच काम सुरू होईल.

पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चिला जातो आहे. २०१६-१७ मध्ये याला मंजुरी मिळाली. यासाठी ५२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याला ३१ कोटींचा निधी मंजूर झाला. तो पुणे विभागाला मिळालादेखील; मात्र अद्याप कामास सुरुवात न झाल्याने याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. यार्डचे रिमॉडेलिंग न केल्याने फलाटांची लांबी वाढली नाही. परिणामी गाड्यांना प्रवाशांची गर्दी असतानादेखील रेल्वेला डबे वाढविता येत नव्हते. परिणामी, दररोज ४० हून अधिक गाड्यांच्या सुमारे १८ हजार १८४ प्रवाशांना ‘वेटिंग’वर राहावे लागते. तसेच ७० हून अधिक गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागते. त्यामुळे यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास सुरुवात होणे गरजेचे आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाने यासाठी आवश्यक असलेले ‘डीसीएन’ तयार केले आहे. यात कोणत्या गाड्या रद्द करायच्या, कोणत्या गाड्यांचे मार्ग बदलायचे या बाबतचा तपशील आहे. कामाची सुरुवात मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमधून होणार आहे. किमान पाच तासांचा ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक दरम्यानच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे.

पुणे ते मुंबई दरम्यान विद्युतीकरणाचे काम झाले होते. मात्र पुणे ते वाडी तसेच दक्षिण भारतातल्या काही भागाचे विद्युतीकरण झाले नव्हते. तेव्हा (मद्रास)हून मुंबईला जाणारी गाडी पुण्याला आल्यावर तिचे डिझेल इंजिन काढून त्याजागी विद्युत इंजिन जोडले जात असे. मद्रासचे डिझेल इंजिन म्हणून त्याला सांबार सायडिंग म्हटले जात असे. आतादेखील त्याजागी दोन इंजिन ठेवलेले असतात. थोडक्यात ही इंजिन ठेवण्याची जागा होती. फलाट विस्तारीकरणात हे सांबार सायडिंगदेखील काढून टाकण्यात येणार आहे.

पुणे स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामास डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कमीत कमी गाड्या रद्द व्हाव्यात यासाठीचे नियोजन सुरू आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे