PMC
PMC Tendernama
पुणे

PMC अन् 'पाटबंधारे'तील वादावर असा काढणार तोडगा

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) घेतले जाणारे धरणातील पाणी, त्यासाठी येणारे बिल, तसेच होणारी पाणी गळती या मुद्यांवरून महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडील आकडेवारीत तफावत असल्याने वाद निर्माण होत आहे. हे वाद मिटविण्यासाठी दोन्ही विभागाचे अधिकारी एकत्र येऊन प्रत्यक्ष जागा पाहणी करून तोडगा काढला जाणार आहे. यासंदर्भातील पहिली बैठक बुधवारी पार पडली.

पुणे महापालिका पाणी जास्त वापरते, तसेच गळती कमी केली जात नसल्याच्या संदर्भाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच एक बैठक घेतली. त्यामध्ये महापालिकेवर लोकप्रतिनिधींनी टीका केली. यानंतर आता महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्यासाठी प्रत्यक्ष जागा पाहणी, चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीला आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आम्ही जेव्हा धरणातून कॅनॉलमध्ये २५० एमएलडी पाणी सोडतो तेव्हा महापालिका १० एमएलडी पाणीच घेते, त्यामुळे उर्वरित पाण्याचे बिल द्यावे लागते, असे सांगितले. ही माहिती महापालिकेसाठी धक्कादायक होती. हे पाणी कॅनॉलमधून सोडण्याऐवजी खडकवासला येथील बंद जलवाहिनीतूनच सोडावे त्यामुळे बिल कमी होईल आणि पाण्याच अपव्यय कमी होईल, असा उपाय महापालिकेकडून सांगण्यात आला. त्यास पाटबंधारे विभागाने संमती दर्शविल्याचे अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी सांगितले.

भामा आसखेड धरणातून पुण्याला २.६३ टीएमसी पाणी देण्यात येते, त्यामुळे खडकवासला धरणातील तेवढा पाणी वापर कमी करा, असे पाटबंधारे विभागाकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतचा लेखी आदेश असल्यास तो दाखवा अशी मागणी केली. पण तसा आदेश नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यामुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे. शहरातील औद्योगीक क्षेत्रात वाढ झालेली नाही तरीही या क्षेत्राची वाढ गृहीत धरून बिल पाठवले जात आहे. याची वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यातही सुधारणा करण्याचे मान्य केले.
शहरातील सिंचन क्षेत्र कमी झाल्याने हे पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी मागणी महापालिकेने केले आहे. परंतु, शहरातील किती क्षेत्र कमी झाले आहे याची मोजणी झालेली नसल्याने, मोजणी करून ही माहिती महापालिकेला दिली जाईल, असे आश्‍वासन बैठकीत दिले. ही आकडेवारी स्पष्ट झाल्यास शहराच्या पाणी कोट्यात वाढ होऊ शकते