PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

पुणे महापालिकेची डोकेदुखी संपणार; पदभरतीच्या प्रक्रियेत 'हा' बदल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेत पदभरती (PMC) करताना कनिष्ठ अभियंतापदासाठीची अनुभवाची अट रद्द होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची अनुभव प्रमाणपत्रे (ते खरे आहे की खोटे) तपासणी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने भरती प्रक्रियेतून अनुभवाची अटच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे.

राज्य शासनाने महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला २०१४ मध्ये मंजूर दिली. मात्र २०२१ पर्यंत पदभरती झालेली नाही. कोरोनाच्या काळातही भरतीवर बंदी होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शासनाने गेल्या वर्षी लिपिक, कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी सल्लागार अशा ४४८ जागांसाठी भरती पहिल्या टप्प्यात पूर्ण केली. यासाठी २०१४च्या सेवा प्रवेश नियमावलीतील अटी व शर्तींचे पालन करण्यात आले. कनिष्ठ अभियंता या पदासाठी तीन वर्षांची अनुभवाची अट टाकण्यात आलेली होती. महापालिकेला अनुभव संपन्न व हुशार उमेदवार मिळावेत, यासाठी या अटीचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना तारेवरची कसरत होत आहे. गुणवत्तेसह अनुभव असणाऱ्या उमेदवारांची निवड होणार, यामुळे अनेकांनी बनावट अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

का झाली अट रद्द?
कनिष्ठ अभियंतापदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कागदपत्र पडताळणीचे काम सुरू होते, ते शुक्रवारी पूर्ण होऊन अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. पण अनुभव प्रमाणपत्र खरे आहे की खोटे हे तपासण्यासाठी प्रशासनाला इन्कम टॅक्स रिटन, पीएफ, बँकेचे स्टेटमेंट, सीएचे प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करावी लागली. बनावट प्रमाणपत्राद्वारे एकाही उमेदवाराची निवड होऊ नये, यासाठी बराचसा कस लागला. दरम्यान, राज्यात अनेक महापालिकांमध्ये अनुभवाची अट नाही, मग पुणे महापालिकेत का आहे, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. महापालिकेने माहिती घेतली असताना पिंपरी-चिंचवड, नाशिक महापालिकेत अनुभवाची अट नसल्याचे समोर आले. त्यानुसार महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत बदल करून अनुभावाची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा प्रस्ताव महापालिकेत स्थायी समिती सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी सुरू होईल. यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेने भरती प्रक्रियेतील अनुभवाची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इतर महापालिकांमध्येही ही अट नाही. तसेच नव्याने पदवी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगली संधी उपलब्ध होईल.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

महापालिकेला चांगले कर्मचारी हवे असतील तर त्यांनी अनुभवाची अट कायम ठेवली पाहिजे. अनुभवाची अट नसल्यास स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. कागदपत्र पडताळणी, खरे कागदपत्रे शोधण्यासाठी प्रशासनाने कार्यपद्धती निश्‍चित करावी.
- जयश्री जाधव, उमेदवार

चांगल्या दर्जाचे अभियंते मिळावेत, यासाठी अनुभवाची अट टाकली आहे. पण ऑनलाइन परीक्षेत गुणवत्तेच्याच आधारावर उमेवारांना पात्र ठरविले जाणार असल्याने नवख्या उमेदवारांना संधी मिळेल. महापालिकेने अनुभवाची अट काढून टाकावी.
- राहुल पाटील, उमेदवार

अनुभवाची अट काढल्याचे परिणाम
- महापालिका भरतीत स्पर्धा वाढणार
- नुकतीच पदविका, पदवी प्राप्त उमेदवारांना संधी मिळणार
- कागदपत्र पडताळणीतून प्रशासनाची सुटका
- भरती प्रक्रियेचा वेळ कमी होणार
- गुणवत्ता राखण्यासाठी परीक्षा अधिक कडक घ्यावी लागणार

विद्युत अभियंतापदासाठी अट
महापालिकेने अनुभवाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठवला असला तरी त्याचा अंतिम निर्णय होण्यास किमान एक वर्ष लागणार आहे. त्यापूर्वी महापालिकेडून ३०० जागांची भरती केली जाणार आहे. त्यात काही जागा या कनिष्ठ अभियंता (विद्युत) शाखेच्या असणार आहेत. त्या वेळी उमेदवारांना तीन वर्षांच्या अनुभवाची अट असणार आहे.