पिंपरी (Hinjawadi Shivajinagar Metro Line) : बहुप्रतिक्षीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर पहिली मेट्रो कधी धावणार याबाबतची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास सुखकर होण्यार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पुढाकाराने होत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या ९० टक्के पूर्ण झाले आहे. मार्च २०२६ मध्ये एकाच टप्प्यात या मार्गावर मेट्रो धावणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. संबंधित प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली.
दरम्यान, कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल संबंधित कंपनीवर प्रशासनाने कारवाई करत ठेकेदाराला मुदतवाढ दिली. त्यानंतर मार्च २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
येथील स्टेशन व इतर कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. हिंजवडी ते बालेवाडी स्टेडियम या सुमारे १४ किलोमीटर अंतरावर ऑगस्टमध्ये मेट्रोची ‘ट्रायल रन’ अर्थात चाचणी यशस्वी झाली आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.