Har Ghar Tiranga
Har Ghar Tiranga Tendernama
पुणे

गुजरातमधील निकृष्ट ठेकेदारांना पुणेकरांचा हिसका; किमान झेंडेतरी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष (Har Ghar Tiranga) मोठ्या थाटामाटात साजरे करण्यासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकार (Central Government) आणि ठेकेदाराकडून (Contractor) पुणे महापालिकेला निकृष्ट दर्जाच्या तिरंगा झेंड्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे चार लाख ७० हजार झेंड्यांपैकी तब्बल ४ लाख झेंडे परत पाठवून देण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. राष्ट्रध्वजाचा (National Flag) अवमान होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही भूमिका घेतल्याचे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले.

यंदाच्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याने केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम आयोजित केला आहे. प्रत्येक नागरिकाने सन्मानपूर्वक आपल्या घरावर तिरंगा फडकवून अभिवादन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखणे आवश्‍यक आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे, डाग पडलेले, तिरके कापलेले, अशोकचक्र मध्यभागी नसलेले झेंडे आम्ही स्विकारले नाहीत. खराब झालेले झेंडे ठेकेदाराला परत केले आहेत. शासनाकडून आलेले अडीच लाख झेंडेही परत केले आहेत. राजकीय पक्ष, संस्था, संघटनांकडून झेंड्यांबद्दल चौकशी होत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत इतर ठिकाणांवरून चांगले झेंडे मिळतील का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे तयारी
हा उपक्रम व्यापकतेने राबविला जाणार असल्याने महापालिकेने पुणेकरांना ५ लाख झेंडे मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ८५ लाख रुपयांचे टेंडरही मंजूर केले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वितरणाची व्यवस्था करण्यात आली, तर घरोघरी झेंड्यांचे वितरण करण्यासाठी प्रत्येक सोसायटीला किती झेंड्यांची गरज आहे, याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांनी संकलित करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार ठेकेदाराने महापालिकेला पहिल्या टप्प्यात सुमारे २ लाख २० हजार तिरंगा झेंड्यांचा पुरवठा केला, तर केंद्र शासनाकडून महापालिकेला २ लाख ५० हजार झेंडे पाठवून देण्यात आले.

का नाकारले झेंडे?
महापालिकेला झेंडे मिळाल्यानंतर त्यांची तपासणी केली असता ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. झेंड्यांचे कापड सुमार दर्जाचे होते. तिरंग्यातील अशोकचक्र मध्यभागी नाही, झेंड्यावर पडलेले रंगाचे डाग, अस्वच्छ कापड, शिलाई व्यवस्थित नाही, काठी लावण्यासाठी जागा नाही, अशी स्थिती आहे. महापालिकेच्या ठेकेदाराने २ लाख २० हजार झेंडे पुरविले, त्यातील चांगले असलेले ७० हजार झेंडे ठेवून उर्वरित परत पाठविले आहेत, तर केंद्र शासनाकडून आलेले सर्वच झेंडे खराब असल्याने ते देखील परत पाठवून देण्यात आले आहेत.

सुरत, अहमदाबादेतून झेंड्यांचा पुरवठा
घरावर तिरंगा लावण्यासाठी केंद्र सरकारने नियम शिथिल केले आहेत, त्यात सुतीसह पॉलिस्टर व इतर कापडाचे झेंडे लावता येणार आहेत. याचे बहुतांश पुरवठादार सुरत, अहमदाबाद येथील आहेत. त्यांच्याकडे निकृष्ट झेंड्यांची तक्रार केल्यानंतर त्यांनी असेच झेंडे उपलब्ध आहेत, असे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात तिरंगा ध्वजाचे उत्पादक कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने झेंडे मिळण्यास अडचण होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली.

क्षेत्रीय कार्यालयांना २ लाखांच्या खर्चास मान्यता
मुख्य खात्याकडून ५ लाख झेंडे विकत घेतले जाणार आहेत; पण ते निकृष्ट दर्जाचे निघाले. शहराच्या सर्व भागांतील नागरिकांना झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना २ लाख रुपयांपर्यंत झेंडे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.