पुणे (Pune): प्रवाशांना ‘आरएसी’ व प्रतिक्षा यादीतील तिकिटाची स्थिती समजण्यासाठी आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. गाडी सुटण्याच्या आठ तास आधीच ‘चार्ट’ तयार होईल. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची स्थिती समजू शकेल. हा बदल गुरुवारपासून (ता. १०) लागू झाला आहे.
‘चार्ट’ आठ तास आधी
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांच्या सोईसाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाईल. याआधी ‘चार्ट’ आठ तास आधी तयार करण्यात येत होता. त्यामुळे ‘आरएसी’ व प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना निर्णय घेणे अवघड ठरत होते.
आदल्या दिवशी रात्री ९ वाजता तयार होणार चार्ट
आता नव्या नियमात पहाटे पाच ते दुपारी दोन या वेळेत सुटणाऱ्या गाडीचा ‘चार्ट’ आदल्या दिवशी रात्री नऊ वाजता तयार होईल. ज्या गाड्या दुपारी दोन ते पहाटे पाच या वेळेत सुटतात त्यांचे ‘चार्ट’ वेळेच्या आठ तास आधी जाहीर होतील. हे दोन्ही पहिले ‘चार्ट’ असतील, तर दुसरा ‘चार्ट’ गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीच होईल. दुसऱ्या ‘चार्ट’च्या वेळेत कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.