Transport Hub
Transport Hub Tendernama
पुणे

अखेर पुण्यातील 'हे' स्थानक होणार मल्टिमॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हब

टेंडरनामा ब्युरो

आपुणे (Pune) : शिवाजीनगरला मल्टिमॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हब करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. वाकडेवाडी येथे स्थलांतरित झालेले एसटी बसस्थानक आता परत शिवाजीनगरलाच होण्यावर एसटी व मेट्रोमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे एसटी बसस्थानक, मेट्रो, रेल्वे, पीएमपी अशा अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. बसस्थानकाच्या उभारणीचा खर्चदेखील एकत्रितरीत्या करण्यावर दोन्ही संस्थांमध्ये सहमती आहे. यासाठी सुमारे ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नवे बसस्थानक उभारताना त्यावर दहा मजली व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे.

दोन बैठकांनंतर एकमत
एसटी व मेट्रो प्रशासन यांच्यात याबाबत दोन बैठका झाल्यानंतर मेट्रोने नरमाईची भूमिका घेत एसटी प्रशासनाच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. शिवाय बसस्थानकाच्या खर्चालादेखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मूळ जागीच तेदेखील दोघे मिळून बसस्थानकाच्या उभारणीचा खर्च करण्यावर एकवाक्यता झाली आहे.

मल्टिमॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हब
राज्य परिवहन महामंडळाने शिवाजीनगर बसस्थानकावर मल्टिमॉडेल ट्रान्स्पोटेशन हब उभारण्याचे प्राथमिक स्तरावर नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना येथूनच मेट्रो व रेल्वे तसेच पीएमपीच्या बसने प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. स्वारगेट बसस्थानकाच्या बाबतीत असेच नियोजन आहे. मात्र याच्या कामास अद्याप सुरवात झालेली नाही.

शिवाजीनगर बसस्थानकाची जागा : ४ एकर
फलाट : अंदाजे २५
बसच्या फेऱ्या : १६००
स्थानकातील दैनंदिन प्रवासी वाहतूक : ७५०० ते ८०००

पुणे एसटी विभाग
आगार : १३
एकूण बस : ८५०
रोजची प्रवासी संख्या : १ लाख ४० हजार

शिवाजीनगर बसस्थानकाविषयी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठक झाली. मूळ जागीच (शिवाजीनगर) बसस्थानक उभारणार आहे. मेट्रोनेदेखील त्यास आवश्यक ती मदत करण्याचे मान्य केले आहे. लवकरच सल्लागार नेमून बसस्थानकाचा आराखडा तयार करण्याच्या कामास सुरवात होईल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

एसटी प्रशासन व मेट्रो दोन्ही सरकारी संस्था आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन शिवाजीनगर बसस्थानकाची निर्मिती करू. एसटी प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करू.
- हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, मेट्रो